जालना,दि.17(जिमाका): राज्यातील
गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन 2026-27 या
वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन पशुवैद्यकीय जैव पदार्थ
निर्मिती संस्था, पुणे येथे सुरू झाले आहे. 21 व्या पशुगणनेनुसार राज्यातील
जिल्ह्यानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्यात एकूण लस
उत्पादनाच्या 40 टक्के 37 लाख 52 हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू
करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी
प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन
आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे या संस्थेने
आवश्यक लसमात्रांचे उत्पादन यशस्वीपणे केले आहे. सर्व जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन
व दुग्ध व्यवसाय यांनी पुरवण्यात आलेली लस क्षेत्रीय स्तरावर वेळेत पोहोचवताना
तिची शीत साखळी कुठेही खंडित होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी, गोटपॉक्स
लसमात्रा प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षमता
असलेल्या पशुंचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, लसीकरणाच्या विहित नमुन्यातील
बिनचूक आणि एकत्रित दैनंदिन अहवाल दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत विभागनिहाय संस्थेकडे
सादर करावा; अशा सूचना पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे या संस्थेचे
सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. याहयाखान पठाण यांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व
दुग्धव्यवसाय यांना केल्या आहेत.
हॉटस्पॉट तालुक्यांवर
विशेष लक्ष
गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लंपी
चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या भागात प्राधान्य
क्रमाने लसीकरण मोहीम राबवावी. या व्यापक मोहिमेसाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध
संघ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक व सेवादाते यांचे सक्रिय सहकार्य
घेण्यात यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेला करण्यात
आले आहे. पशुधनाच्या
सुरक्षिततेला प्राधान्य
"लंपी चर्मरोगासारख्या (LSD)
संसर्गजन्य आजारांपासून आपल्या राज्यातील गोधनाची सुरक्षा करणे हे पशुसंवर्धन
विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या
शेतकरी बांधवांचा मुख्य कणा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी
गोटपॉक्स लसीकरण हाच एकमेव आणि सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे.
सद्यस्थितीत हा उपाय क्षेत्रीय स्तरावर आम्ही मोहिम स्वरुपात योजत आहोत.
पशुपालकांनीही विभागास सहकार्य करावे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment