Monday, 31 August 2026

जालन्यात ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा • पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, आरोग्य तपासणी व विविध उपक्रमांचे आयोजन

 

 

जालना,दि.31 (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या निर्देशानुसार 31 ऑगस्ट हा ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून जालना येथे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अनिता राठोड, प्रा. बी. वाय. कुलकर्णी, प्रा. अंकुश चव्हाण, विकास राठोड, विष्णुगिरी, अशासकीय सदस्य मुकेश भारद्वाज, मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक यांची उपस्थिती होती.

यावेळी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आरोग्य तपासणी शिबिर, व्याख्याने व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच भटके विमुक्त जाती-जमातींच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भटके विमुक्त समाजाची संस्कृती, जीवनमूल्ये व परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य तपासणी, आधारकार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासाठी शिबिरे आयोजित करण्याबाबत संबंधित विभागांना कळविण्यात आले.

मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक अनंत कदम यांनी यावेळी ‘भटके विमुक्त दिवस’चे महत्त्व विशद करून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश बहिर यांनी केले. श्रीमती स्नेहल सोनावळे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या बोलीभाषेत मनोगत व्यक्त केले. प्रा. अंकुश चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर मुख्य वक्ते प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी भटके विमुक्त समाजाचा इतिहास, संस्कृती, सामाजिक परिस्थिती तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्ही. के. चव्हाण यांनी केले.

बंजारा समाजाची सांस्कृतिक ओळख असलेल्या पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

-*-*-*-*-*-

 

 

Thursday, 27 August 2026

मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन कक्ष

 

जालना,दि.27(जिमाका) :  मराठा समाजातील नागरिकांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाइन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाइन कक्षाच्या माध्यमातून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, कागदपत्रे व पुराव्यांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेल्पलाइन कक्षासाठी नव्याने नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (गृह) परमेश्वर शिंदे, तसेच महसूल सहाय्यक संदिप इंगळे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे..

नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविताना आवश्यक असलेल्या पुराव्यांची माहिती उपलब्ध करून देणे, अर्जाची प्रक्रिया समजावून सांगणे, उपलब्ध अभिलेखांमधून आवश्यक नोंदी शोधण्यास मदत करणे तसेच अर्जदारांच्या अडचणींचे योग्य प्रकारे निराकरण हेल्पलाइन कक्षामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषतः उपलब्ध अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा किंवा कुणबी जातीच्या नोंदी आढळल्यास त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन नागरिकांना केले जाणार आहे. तसेच संबंधित नोंदी व पुराव्यांच्या आधारे पात्र नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत हेल्पलाइन कक्षात उपस्थित राहून, नागरिकांकडून कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे, उपलब्ध अभिलेखांची नोंद घेणे, आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे तसेच सेवे संबंधी बाबींमध्ये आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य करणार आहेत. तसेच हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या शंका व अडचणींचे योग्य प्रकारे निराकरण करून, आवश्यकतेनुसार संबंधित विभाग/अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे घेऊन हेल्पलाइन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात माहिती, मार्गदर्शन अथवा अडचणींसाठी हेल्पलाइन क्रमांक ०२४८२-२२३१३२ वर संपर्क साधवा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

 

****

 

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील गणेश मंडळांना सहभागी होण्याच आवाहन

 



जालना,दि.27(जिमाका) :  शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026' आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेचा विस्तार राज्यस्तरासोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध स्तरांवर पारितोषिके जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. स्पर्धेचे अर्ज अकादमीच्या संकेतस्थळावर https://ganeshotsav.pldmka.co.in, या ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार, दि.7 सप्टेंबर, 2026 निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

या महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरावर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in,या पोर्टलद्वारे ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 असून ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत.

विजेत्या मंडळांना जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या https://ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल. याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे प्रसिद्ध, करावीत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

 

*****

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेळो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ उत्साहात संपन्न


जालना,दि.27(जिमाका) : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत, जालना यांच्या सहकार्याने जी.ई.एस. महाविद्यालय, जालना येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘खेळो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडाप्रेमी तसेच युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी व्हिडिओ संवाद साधून केलेले मार्गदर्शन. आपल्या संवादातून त्यांनी युवकांना खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता जीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले. नियमित क्रीडा सहभागामुळे शरीर सुदृढ राहण्यासोबतच शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना आणि संघर्ष करण्याची क्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले. युवकांनी खेळाच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेशही त्यांनी दिला.

जी.ई.एस. महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अत्रेहोत्री, उपप्राचार्य डॉ. उमेश मोगले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुमंत बिक्कड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. किशोर कुमार तापडिया, डॉ. हेमंत वर्मा यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विविध विभागांचे प्राध्यापक, क्रीडा विभागाचे पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान युवकांना क्रीडा क्षेत्रातील विविध संधी, खेळाडू म्हणून घडताना येणारी आव्हाने आणि क्रीडेमुळे व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणारी चालना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद उत्साहाने ऐकला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी नव्या उमेदीची भावना निर्माण झाली.

कार्यक्रमानंतर खो-खोच्या राष्ट्रीय खेळाडू गायत्री शिंदे तसेच इतर खेळाडूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या क्रीडा प्रवासातील अनुभव, सरावातील सातत्य, स्पर्धेतील आव्हाने आणि यशासाठी आवश्यक असलेली मेहनत याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘खेळा, निरोगी राहा आणि देशाच्या विकासात योगदान द्या’ हा संदेश देण्यात आला. क्रीडा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती मिळाल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वयंसेवक, मेरा युवा भारतचे पदाधिकारी तसेच युवक मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

****

लोकशाही दिनाचे 7 सप्टेंबर रोजी आयोजन

 

जालना,दि.27(जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 7 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.  लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. ज्या अर्जदाराने तालूकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही, अशा अर्जदाराचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे. 

लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्वी, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.  तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना http://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

 

****

Tuesday, 25 August 2026

‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ कार्यक्रमाचे जालना येथे आयोज

 

जालना,दि.25(जिमाका) :  आगामी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत (MY Bharat), जालना यांच्या सहकार्याने जे.ई.एस. महाविद्यालय व अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या वतीने ‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यानिमित्त युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे, क्रीडा विकासाला चालना देणे आणि राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका अधिक बळकट करणे, या उद्देशाने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘युवा कनेक्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि भविष्यातील संधी यावर संवाद साधण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद. देशभरातील विविध ठिकाणांहून लाखो युवक या उपक्रमाशी जोडले जाणार असून, जालना जिल्ह्यातील युवकांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवक, MY Bharat स्वयंसेवक, NSS स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास, क्रीडा क्षेत्रातील उपलब्ध संधी, ग्रामीण व तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन तसेच भारतात विकसित होत असलेल्या क्रीडा परिसंस्थेबाबत विचारमंथन करण्यात येणार आहे.

यावेळी आयोजित ‘युवा संवाद’ मध्ये युवकांना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपल्या कल्पना, सूचना व आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. क्रीडा परिसंस्थेचे बळकटीकरण, २०३६ ऑलिम्पिकसाठी क्रीडा प्रतिभेचे संवर्धन, युवा नेतृत्व व प्रशासनातील सहभाग आणि विकसित भारतासाठी युवा सक्षमीकरण या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे.

युवकांच्या सूचना व कल्पना QR कोडच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार असून, उपस्थित युवकांना VBYLD Quizमध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित केले जाणार आहे. मेरा युवा भारत (MY Bharat), जालना, जे.ई.एस. महाविद्यालय आणि अंकुशराव टोपे महाविद्यालय यांच्या वतीने जिल्ह्यातील युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या कल्पना व सूचना मांडाव्यात आणि ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

****

 

*राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन*

 

*12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन* 

 

जालना,दि.25(जिमाका) :  जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे.

लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे.

लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते.

ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

****

अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासन सतर्क; महिला, नवजात बालके व अतिसंवेदनशील रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

*जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे तातडीने फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करावे – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल*

 


जालना,दि.25(जिमाका) : अमरावती येथील रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेचा तातडीने आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच इतर सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यासंदर्भात जिल्हाधिकारी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज संबंधित विभागांची ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग तसेच संबंधित आरोग्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

रुग्णालयांच्या सुरक्षा ऑडिटदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींची केवळ नोंद करून न थांबता त्यावर तातडीने सुधारात्मक कार्यवाही करण्यात यावी. संबंधित यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचे अनुपालन सुनिश्चित करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

विशेषतः महिला व बाल रुग्णालयातील SNCU, NICU, प्रसूती कक्ष, बालरुग्ण विभाग, ICU, ऑपरेशन थिएटर आणि ऑक्सिजन सुविधा असलेल्या विभागांची प्राधान्याने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था सक्षम आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

फायर ऑडिटमध्ये फायर एक्स्टिंग्विशर, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तसेच रुग्णालयातील अग्निसुरक्षेच्या अन्य उपाययोजनांची कार्यक्षमता तपासण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्युत वायरिंग, विद्युत पॅनेल, अर्थिंग, जनरेटर आणि इतर विद्युत उपकरणांची कार्यस्थितीही प्रत्यक्ष तपासण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.

रुग्णालयांमध्ये आग किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणत्या पद्धतीने रुग्णांचे स्थलांतर करायचे, यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेने स्पष्ट Hospital Fire & Emergency Response Plan तयार ठेवावा. या योजनेत नवजात बालके, गर्भवती व प्रसूती झालेल्या महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, ICU मधील रुग्ण तसेच हालचाल करण्यास असमर्थ रुग्णांच्या सुरक्षित आणि जलद स्थलांतरासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करावी, असेही सांगण्यात आले.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अग्निसुरक्षा प्रशिक्षणासोबत प्रत्यक्ष मॉकड्रिल घेण्याचे निर्देश ही यावेळी देण्यात आले आहेत. डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि अन्य रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना आग लागल्यानंतर करावयाच्या प्रथम प्रतिसादाची माहिती देण्यात यावी.

अग्निशमन उपकरणांचा योग्य वापर, फायर अलार्म यंत्रणा, आपत्कालीन संपर्क व्यवस्था आणि रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर याबाबत कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात यावे. आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नियमित सराव करण्यावरही भर देण्यात आला.

“रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेषतः महिला, नवजात बालके, लहान मुले, दिव्यांग व्यक्ती आणि अतिदक्षता विभागातील रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत अधिक असुरक्षित असतात. त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेबाबत कोणत्याही स्तरावरील निष्काळजीपणा स्वीकारला जाणार नाही. संभाव्य धोका आधीच ओळखून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात,” असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट, ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता, मॉकड्रिल आणि कर्मचारी प्रशिक्षण या सर्व बाबींवर आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी. या सर्व कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी दिले.

 

****

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मोफत मोटर व्यावसायिक ड्रायव्हर प्रशिक्षण

 

*जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम; रस्ता सुरक्षेसह रोजगाराच्या संधींना चालना देण्याचा प्रयत्न*

 

जालना,दि.25(जिमाका) : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारी कमी करण्याबरोबरच रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी युवकांना मोटर व्यावसायिक ड्रायव्हर प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT), पुणे आणि इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR), पुणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत पात्र युवक-युवतींना हलके मोटार वाहन (LMV) तसेच जड मोटार वाहन (HMV) चालविण्याचे शास्त्रोक्त, तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. प्रशिक्षणामुळे युवकांना वाहनचालक क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परिवहन क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना केवळ वाहन चालविण्याचे प्रशिक्षण न देता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, वाहनांची तांत्रिक माहिती आणि सुरक्षित वाहनचालक म्हणून आवश्यक असलेल्या विविध बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये VR Simulator, हायवे ड्रायव्हिंग तंत्र, ट्रॅफिक साईनबोर्डची माहिती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यांचा समावेश असणार आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या कालावधीत निवासाची तसेच भोजनाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान दररोजचा अल्पाहार व जेवणाची सुविधा देण्यात येणार असून, निवासी प्रशिक्षणामुळे युवकांना प्रशिक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थींची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार चष्म्याचे वाटपही केले जाणार आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रथमोपचार व आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक कौशल्ये, वाहनांची देखभाल, सुरक्षित ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

LMV आणि HMV प्रशिक्षण

उपलब्ध माहितीनुसार, LMV प्रशिक्षणाचा कालावधी सुमारे ३० दिवस, तर HMV प्रशिक्षणाचा कालावधी साधारण ३० ते 45 दिवस आहे. HMV प्रशिक्षणासाठी ‘SARATHI Project’ आणि LMV प्रशिक्षणासाठी ‘PARWAZ Project’ अंतर्गत प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना व्यावसायिक वाहनचालक म्हणून रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.

या प्रशिक्षणामुळे युवकांना वाहनचालक क्षेत्रातील आवश्यक व्यावसायिक कौशल्ये प्राप्त होतील. परिणामी परिवहन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासोबतच बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

या प्रशिक्षण उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), जालना येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड यांनी केले आहे. प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR), फुरसुंगी, पुणे येथे होणार आहे. उपक्रमाचे समन्वयक म्हणून केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, CIRT पुणे व IDTR पुणे यांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. अधिक माहितीसाठी idtrpune@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल. जालना येथील आर.टी.ओ. कार्यालयाच्या माध्यमातूनही इच्छुक युवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी idtrpune@gmail.com ई-मेलनी  ITDR पुणे येथे संपर्क साधावा,

****

Monday, 24 August 2026

*मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना; पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

जालना,दि.24(जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य प्रशिक्षण विकास योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, बीजभांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना आदी विविध योजना राबविण्यात येतात.

जालना जिल्ह्यात संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुळस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. अधिका माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना दूरध्वनी क्र. 02482-223420 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ  मर्या. जालना यांनी केले आहे.

 

****

Friday, 21 August 2026

जालना जिल्ह्यात परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड

 


जालना,दि.21(जिमाका) :  राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार असून, या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र अर्जदारांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सन २०२६-२७ या वर्षात ‘राज्य पुरस्कृत योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण तसेच विविध कृषी विषयक तांत्रिक बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यासाठी या योजनेंतर्गत एकूण 5 शेतकऱ्यांची लक्षांकित निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून 14 ऑगस्ट, 2026 रोजी पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची मार्गदर्शक सूचनांनुसार छाननी करण्यात आली असून, जालना जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या निर्धारित लक्षांकापेक्षा अधिक असल्याने पात्र लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.

ही सोडत 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार असून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अर्जदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील संबंधित पात्र अर्जदार शेतकऱ्यांनी सदर सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गहीनीनाथ कापसे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


            जालना दि. 21 (जिमाका) :-   जिल्ह्यात दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी ईद-ए- मिलाद, दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षा बंधन, दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी श्रीकृष्ण जयंती, तसेच दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी गोपाळकाला (दहिहंडी) इत्यादी सण – उत्सव साजरे होणार आहेत. या सण, उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

 तसेच  सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये विविध समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांच्या तसेच आरक्षण बचावच्या दृष्टीने तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी उपोषणे आंदोलने,मोर्चे, धरणे इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. या मागण्यांच्या दृष्टीने  भविष्यातही विविध स्वरुपाची आंदोलने, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी कार्यक्‌रम आयोजित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची

शक्यता नाकारता येत नाही. 

         त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

            तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.23.8.2026 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 6.9.2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-      

जलसंधारणासाठी जालन्यात एकजूट; ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद जलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन’ संपन्न

 











 

जालना,दि.21(जिमाका) : जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारण दिनानिमित्त आज (दि.21) रोजी ‘महावॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोलीस मैदानापर्यंत झालेल्या यावॉकेथॉनमध्ये मोठ्या संख्येने शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकररावजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर वंदना मगरे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत उपस्थितांनी जलसंधारणाची शपथ घेतली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवूनवॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रावण उदयभान शेंडे, कार्यालयीन अधीक्षक के.एस.जावळे यांची उपस्थिती होती.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय, घाटी हॉस्पिटल, सत्कार कॉम्प्लेक्स, अंबड चौफुली मार्गे पोलीस मैदान असा वॉकेथॉनचा मार्ग होता. सहभागी नागरिकांनी उत्साहात 3.1 किलोमीटर महावॉकेथॉनचे अंतर पूर्ण केले. यावेळी जलसंधारणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत, पाणी बचत व जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

पोलीस मैदानावर झालेल्या समारोप कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि महापौर वंदना मगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी लकी ड्रॉमधून दहा विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील जलदूत, विविध सेवाभावी संस्था आणि रोटरी क्लब, जालना यांचा सन्मान करण्यात आला.

या महावॉकेथॉनमध्ये जालना शहरातील शांती निकेतन विद्यामंदिर, जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनी, मत्स्योदरी कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, जेईएस महाविद्यालय यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महावॉकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक आणि सहकार्य करणाऱ्या विविध संस्थांचे महापौर वंदना मगरे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आभार मानले. जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता झाली.