Friday, 14 August 2026

जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री पंकजा मुंडे स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण; शेतकरी, पशुपालक, युवकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून लाभ

 


जालना,दि.15(जिमाका) : जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य शासन विविध योजना राबवून लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असुन यामाध्यमातून शासन जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधु, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी 2026-27 या वर्षासाठी 547.97 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. जिल्हा स्थापनेला 45 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘रायझिंग जालना’ हा विशेष विकासात्मक कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. बीज, स्टील आणि रेशीम हे जालना जिल्ह्याच्या विकासाचे तीन प्रमुख आधार असून, त्यावर आधारित विकासाला चालना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जालन्यातील महिलांनी रेशीमपासून साडी विणकाम सुरू केले असून त्यांचे कौशल्य आणि तयार होणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता उल्लेखनीय आहे. जालन्यात तयार होणाऱ्या सिल्क उत्पादनांच्या 'जालनाई' हा एक मोठा ब्रँड म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

जिल्ह्यात 5 लाख 68 हजार हेक्टरवर खरीप पेरणी

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 6 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, आतापर्यंत 5 लाख 68 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात जालना जिल्ह्यातील 18 हजार 792 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 116 कोटी रुपये ऑनलाइन जमा करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून 2025-26 मध्ये सुमारे 11 हजार शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत 67 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 52 लाभार्थ्यांना सुमारे 2 कोटी रुपयांचे कर्ज, तर 87 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 39 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, 22 समुदायाधारित संस्थांना सुमारे 22 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत 2025-26 मध्ये अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या 127 शेतकऱ्यांच्या वारसांना 2 कोटी 53 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

पशुपालकांसाठी विमा, ई-पशुसेवेची सुविधा

पशुधनाचा अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे मृत्यू झाल्यास पशुपालकांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी पशुधन विमा योजना राबविण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय सेवा अधिक सुलभ करण्यासाठी ‘ई-पशुसेवा’ ॲप विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे पशुपालकांना पशूंच्या आजारांबाबत प्राथमिक सल्ला व उपचाराचे मार्गदर्शन घरबसल्या मिळणार आहे.

‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ लवकरच सुरू करण्यात येणार असून, महाडीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाणार आहे. या योजनेत दूधाळ संकरित गायी, म्हशी तसेच कुक्कुट पक्षी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महसूल सेवा आता घरपोच

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’अंतर्गत जिल्ह्यात समाधान शिबिरे घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात 64 मंडळांमध्ये घेण्यात आलेल्या शिबिरांमधून सुमारे 40 हजार लाभार्थ्यांना महसुली सेवा व विविध योजनांचा लाभ देण्यात आला. पाच विधानसभा मतदारसंघांत आयोजित शिबिरांमधून सुमारे 28 हजार नागरिकांना लाभ मिळाला.

नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘जालना मित्र’ हे घरपोच शासकीय सेवा पोर्टल सुरू केले आहे.

युवकांसाठी रोजगाराच्या संधी

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’अंतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 700 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांना 10 कोटी 83 लाख रुपयांचे विद्यावेतन ऑनलाइन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून जिल्ह्यात 423 नवीन उद्योग उभे राहिले असून, त्यातून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

जलसंधारणासाठी 15 ते 21 ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. 21 ऑगस्ट रोजी आयोजित ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केले.

मतदार यादीतील नोंदी अचूक करण्यासाठी नागरिकांनी बूथ लेव्हल ऑफिसरला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जनगणना 2027 अंतर्गत जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील घरोघरी माहिती संकलनाचे काम 100 टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘ई पशुसेवा ॲप’ आणि ‘ऊसमित्र’ पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ लोगोचे अनावरण करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी कार्यालय जालना यांनी  ‘हर घर तिरंगा’ अभियानातंर्गत आयोजित केलेल्या सायकल रॅलीस पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात करण्यात आली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

भाषणानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोस्को कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यात जलन गतीने तपास करुन वेळेत निकाल लागला या प्रकरणात कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी अमंलदाराचा सत्कार करण्यात आला. तसेच गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच वीरपत्नी आणि वीरपित्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

ध्वजारोहण कार्यक्रमात पोलीस दलाच्या वतीने ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment