Tuesday, 25 August 2026

‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ कार्यक्रमाचे जालना येथे आयोज

 

जालना,दि.25(जिमाका) :  आगामी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत (MY Bharat), जालना यांच्या सहकार्याने जे.ई.एस. महाविद्यालय व अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या वतीने ‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यानिमित्त युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे, क्रीडा विकासाला चालना देणे आणि राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका अधिक बळकट करणे, या उद्देशाने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘युवा कनेक्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि भविष्यातील संधी यावर संवाद साधण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद. देशभरातील विविध ठिकाणांहून लाखो युवक या उपक्रमाशी जोडले जाणार असून, जालना जिल्ह्यातील युवकांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवक, MY Bharat स्वयंसेवक, NSS स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास, क्रीडा क्षेत्रातील उपलब्ध संधी, ग्रामीण व तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन तसेच भारतात विकसित होत असलेल्या क्रीडा परिसंस्थेबाबत विचारमंथन करण्यात येणार आहे.

यावेळी आयोजित ‘युवा संवाद’ मध्ये युवकांना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपल्या कल्पना, सूचना व आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. क्रीडा परिसंस्थेचे बळकटीकरण, २०३६ ऑलिम्पिकसाठी क्रीडा प्रतिभेचे संवर्धन, युवा नेतृत्व व प्रशासनातील सहभाग आणि विकसित भारतासाठी युवा सक्षमीकरण या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे.

युवकांच्या सूचना व कल्पना QR कोडच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार असून, उपस्थित युवकांना VBYLD Quizमध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित केले जाणार आहे. मेरा युवा भारत (MY Bharat), जालना, जे.ई.एस. महाविद्यालय आणि अंकुशराव टोपे महाविद्यालय यांच्या वतीने जिल्ह्यातील युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या कल्पना व सूचना मांडाव्यात आणि ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

****

 

No comments:

Post a Comment