Tuesday, 18 August 2026

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून तीन कुटुंबांना सहा लाखांची मदत

 



 

जालना,दि.18(जिमाका) : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत विमाधारकांच्या निधनानंतर त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना विमा दाव्याची रक्कम वितरित करण्यात आली. बँक ऑफ इंडिया, राजूर शाखा, ता. भोकरदन यांच्या वतीने तीन लाभार्थी कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपयांच्या विमा दाव्यांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते संबंधित नामनिर्देशित व्यक्ती चांदरी एक्को येथील श्रीमती जनाबाई ज्ञानेश्वर बेडके, ताडेगाव येथील श्री. राजू गोपाने तसेच खामखेडा येथील श्री. नारायण दामोदर यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या विमा दाव्याचे धनादेश वितरीत करण्यात आले.

यावेळी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मंगेश केदार, बँक ऑफ इंडियाचे राजूर शाखा व्यवस्थापक शाम अंभोरे, नोडल व्यवस्थापक अनिल ठोंबरे, प्रशासन अधिकारी बाबासाहेब औताडे आणि अधिकारी योगेश चोरमारे उपस्थित होते.

जालना जिल्ह्यात सामाजिक सुरक्षा योजनांना प्रतिसाद

जालना जिल्ह्यात केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८.७३ लाख खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये सुमारे ४०३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३.१० लाख नागरिकांची नोंदणी झाली असून, आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक विमा दावे निकाली काढण्यात आले आहेत. या दाव्यांपोटी नामनिर्देशित व्यक्तींना एकूण १०.१२ कोटी रुपयांची विमा रक्कम वितरित करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेलाही जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून, या योजनेअंतर्गत ६.४४ लाख नागरिकांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत ९५ दावे निकाली काढण्यात आले असून, त्यापोटी एकूण १.८९ कोटी रुपयांची विमा रक्कम वितरित करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत १८ ते ५० वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांना वार्षिक ४३० रुपयांच्या हप्त्यात दोन लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण मिळते. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १८ ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांना केवळ २० रुपये वार्षिक हप्त्यात अपघाती विमा संरक्षण उपलब्ध आहे. या दोन्ही योजनांसाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.

ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी बँकांकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. विमा योजनांमुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटात संबंधित कुटुंबाला आधार मिळत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित करावे, असे आवाहन केले.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment