Thursday, 20 August 2026

 

*२१ ऑगस्ट रोजी आयोजित वॉकेथॉनसाठी प्रशासनाची व्यापक तयारी;  मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा*

 


जालना,दि.20(जिमाका) : जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य वॉकेथॉनसाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत 4 हजाराहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून, प्रत्यक्ष कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

जिल्हाधिकारी, जालना यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार सहभागी नागरिकांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता आणि कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन यासाठी विविध व्यवस्था करण्यात येत आहेत.

वॉकेथॉनच्या ठिकाणी सहभागींसाठी नोंदणी व चेक-इन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रम परिसरात आकर्षक प्रवेश कमान, आवश्यक ठिकाणी माहिती फलक, स्टँडीज, तसेच सहभागींसाठी विशेष सेल्फी स्टँड उभारण्यात येणार आहेत. वॉकेथॉनमध्ये जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध संदेश असलेले प्लॅकार्ड्स देखील सहभागींच्या हाती असतील.

कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी विशेष झुंबा उपक्रमासाठी स्वतंत्र स्टेज व आवश्यक ध्वनीव्यवस्था करण्यात येत आहे. सहभागी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे आणि केळी यांसारख्या अल्पोपहाराची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने आरोग्य व सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान वाहतूक व कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त व आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार विविध विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वॉकेथॉनचे नियोजन करण्यात येत असून, हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून जनजागृती, आरोग्य आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा एक मोठा लोकसहभागाचा उपक्रम ठरणार आहे.

जिल्हा प्रशासनाने जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन या वॉकेथॉनला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

 

****

No comments:

Post a Comment