Tuesday, 25 August 2026

*राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन*

 

*12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन* 

 

जालना,दि.25(जिमाका) :  जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे.

लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे.

लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते.

ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

****

No comments:

Post a Comment