Thursday, 20 August 2026

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला

 

जालना,दि.20(जिमाका) : महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट व्हावीत तसेच मतदार यादीच्या शुद्धतेत आणि पारदर्शकतेत सुधारणा व्हावी, या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाची नोंद तपासण्याची तसेच आवश्यक असल्यास दावे व हरकती दाखल करण्याची संधी मिळणार आहे.

प्रारूप मतदार यादीसंदर्भात 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्याचबरोबर 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींबाबत नोटिसा देणे तसेच त्यांची सुनावणी व निपटारा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

विशेष सखोल पुनरिक्षणाच्या या संपूर्ण प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासोबतच अपात्र किंवा चुकीच्या नोंदींबाबत प्राप्त होणाऱ्या दावे-हरकतींची छाननी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव, पत्ता आणि इतर आवश्यक तपशील तपासून पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दावे व हरकतींच्या प्रक्रियेनंतर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून 4 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदारांनी या प्रक्रियेदरम्यान आपली नोंद तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या किंवा हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

 

 

****

No comments:

Post a Comment