जालना,दि.12 (जिमाका) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY 2.0) अंतर्गत पाणलोट विकास घटक
(WDC-PMKSY 2.0) मध्ये अंबड प्रकल्प क्रमांक 1 अंतर्गत सन 2024-25 मध्ये राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड उपक्रमाला
चांगले यश मिळाले आहे. या उपक्रमातून 65 शेतकऱ्यांच्या 51.60 हेक्टर क्षेत्रावर
तब्बल 23 हजार 790 फळझाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे पारंपरिक शेतीला
शाश्वत, अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि पर्यावरणपूरक शेतीची जोड मिळाली आहे.
रोहिलागड, बदापूर, आवा, अंतरवाला,
खेडगाव, चिकनगाव, कौचलवाडी तसेच इतर पाणलोट समिती क्षेत्रातील गावांमध्ये हा
उपक्रम राबविण्यात आला. जलसंधारणाच्या कामांसोबत फळबाग लागवडीची सांगड घातल्याने
शेतकऱ्यांना पाण्याचा कार्यक्षम वापर, जमिनीचे संवर्धन, उत्पादनवाढ आणि
रोजगारनिर्मितीचा लाभ मिळत आहे.
5 प्रकारच्या फळझाडांची लागवड
या उपक्रमांतर्गत विविध उच्चमूल्य
फळपिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यामध्ये डाळिंबाची 12 हजार 709, मोसंबीची 5
हजार 942, आंब्याची 3 हजार 920, सीताफळाची 720 आणि पेरूची 499 रोपे असे एकुण 23
हजार 790 रोपांची लागवड करण्यात आली. या फळबागांसाठी योजनेअंतर्गत 43.06 लाख रुपयांची
गुंतवणूक करण्यात आली. पारंपरिक पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फळपिकांकडे
वळण्यासाठी या उपक्रमामुळे प्रोत्साहन मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा
डाळिंब, मोसंबी, आंबा, पेरू आणि सीताफळ
यांसारख्या उच्चमूल्य फळपिकांमुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची
अपेक्षा आहे. फळबागांची लागवड ही एकदाच होणारी प्रक्रिया नसून तिच्या देखभालीसाठी
वर्षभर विविध कामांची आवश्यकता असते. त्यामुळे छाटणी, सिंचन, तणनियंत्रण, खत
व्यवस्थापन, औषध फवारणी, काढणी, वर्गीकरण आणि बाजारपेठेपर्यंत माल पोहोचविणे अशा
विविध टप्प्यांवर स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
विशेषतः महिलांनाही फळबागांच्या देखभाल
व काढणीसारख्या कामांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने ग्रामीण कुटुंबांच्या
उत्पन्नाला हातभार लागला आहे. गावातच रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाल्याने
रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत
आहे.
मृद संधारण आणि भूजल पुनर्भरणाला चालना
फळबागांमुळे जमिनीवर कायमस्वरूपी हिरवे
आच्छादन तयार होत असल्याने मातीची धूप कमी होण्यास मदत होते. परिणामी सुपीक मातीचे
संरक्षण होऊन जमिनीची उत्पादकता टिकविण्यास हातभार लागतो.
पाणलोट विकासाच्या कामांसोबत फळबाग
लागवडीची सांगड घातल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. त्यामुळे
भूजल पुनर्भरणाला चालना मिळून विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता सुधारण्यास
मदत होत आहे. पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर केल्यास फळबागांमुळे
शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळण्याची शक्यता आहे.
23 हजार 790 झाडांमुळे पर्यावरणालाही
फायदा
फळबाग लागवडीचा फायदा केवळ
शेतकऱ्यांच्या उत्पन्नापुरता मर्यादित राहिलेला नाही. 23 हजार 790 फळझाडांमुळे
परिसरातील हरितक्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. झाडांमुळे मातीचे संरक्षण,
जैवविविधतेला चालना आणि कार्बन शोषणास हातभार लागत आहे. त्यामुळे जलसंधारणाबरोबरच
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
जलसंधारणासोबत फळबागेची यशस्वी सांगड
अंबड प्रकल्प क्रमांक 1 मधील हा उपक्रम
केवळ फळझाडे लावण्यापुरता मर्यादित नसून जलसंधारण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन,
शेतकरी उत्पन्नवाढ, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांना एकत्रितपणे पुढे
नेणारा उपक्रम ठरत आहे. पाणलोट क्षेत्रात उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून
फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्नाचा मार्ग
उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे.
पाणी साठे, झाडे वाढली, उत्पादनवाढीची
आशा निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग खुला झाला, अशी या
उपक्रमाची वाटचाल आहे. PMKSY 2.0 अंतर्गत अंबड प्रकल्पातील फळबाग लागवड ही
जलसंधारण आणि शाश्वत शेतीची प्रभावी सांगड घालणारी यशस्वी वाटचाल ठरत आहे.
-*-*-*-*-*-

.jpeg)


No comments:
Post a Comment