Thursday, 24 September 2026

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


जालना, दि.24(जिमाका)  :   राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

   पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे सोमवार, दि. 28 सप्टेंबर, 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता जालना येथे आगमन दुपारी 1.30 वाजता  बदनापूर  व जालना तालुक्यात पीक परिस्थिती पाहणी करतील. दुपारी 2.30 वाजता जालना येथून वाहनाने मुंबईकडे प्रयाण करतील.

                                                               -*-*-*-*-*-

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून उपक्रम; इंडिगोच्या सीएसआर कार्यक्रमातून मार्गदर्शन






 


 

जालना दि.24(जिमाका) : आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जालन्यातील मुलींना व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) होण्याची दिशा मिळाली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘गिव्हिंग विंग्ज टू फ्लाय’ या विशेष कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील 250 हून अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

इंडिगोच्या सीएसआर उपक्रमांतर्गत भारत केअर्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधी, कमर्शियल पायलट होण्यासाठीची पात्रता, प्रशिक्षण आणि निवड प्रक्रियेबाबत विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया आणि अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या उपस्थितीत झाले. पारंपरिक करिअरच्या पर्यायांबरोबरच विमान वाहतूक क्षेत्रातील संधींचा विचार करण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थिनींना करण्यात आले.

भारत केअर्सचे कार्यक्रम समन्वयक कल्पेश मोहोद आणि मास्टर ट्रेनर रुपेश गाडेकर यांनी विद्यार्थिनींना कमर्शियल पायलट होण्यासाठी आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, प्रशिक्षण तसेच भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी पायलट प्रशिक्षण, अभ्यासक्रम, पात्रता आणि विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरविषयी विविध प्रश्न विचारले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रामुळे विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन झाले.

जालन्यातील बारवाले महाविद्यालयाच्या कॅप्टन गार्गी गिरी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. नुकतेच दक्षिण आफ्रिकेत कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या गिरी यांनी पायलट होण्याचा स्वतःचा प्रवास, प्रशिक्षणादरम्यान आलेल्या अडचणी आणि त्यासाठी केलेल्या मेहनतीची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाची भूमिका होती. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब खरात, शिक्षण विस्तार अधिकारी विनया वडजे, समन्वयक सुनील ढाकरके आणि तंत्रस्नेही सोरटी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. कलेक्टर थिंक टँक फेलो सुप्रविण पाखरे, मुख्यमंत्री फेलो सिमरन जैस्वाल आणि मुख्यमंत्री फेलो तनया सावंत यांनीही आयोजन व समन्वयासाठी सहकार्य केले.

कार्यशाळेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता ‘गिव्हिंग विंग्ज टू फ्लाय’च्या दुसऱ्या बॅचसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत नोंदणी सुरू आहे. पात्र विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने  करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान : ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’चा लाभ घेण्याचे सहायक संचालक अनंत कदम यांचे आवाहन

 

जालना दि.24(जिमाका) : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व विविध प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत 27, 28 आणि 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.

या अभियानासाठी महसूल विभाग, योजनांशी संबंधित विविध शासकीय विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कागदपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.

अभियानात आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध शासकीय योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांची यंत्रणा शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहे.

 

तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक

जालना तालुका : 27 सप्टेंबर रोजी शिकलगीर वस्ती, रामनगर, जालना येथे, तर 28 सप्टेंबर रोजी वडार वस्ती, शिवनगर, जालना येथे शिबिर होणार आहे.

बदनापूर तालुका : 27 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, आन्वी येथे, 28 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, धामणगाव येथे, तर 29  सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, वसंतनगर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अंबड तालुका : 27 सप्टेंबर रोजी नाथगोसावी वस्ती व बाबर वस्ती, अंबड येथे, तर 28 सप्टेंबर रोजी लोहार वस्ती व बंजारा वस्ती, शाहपूर येथे शिबिर होणार आहे.

घनसावंगी तालुका : 27 सप्टेंबर रोजी  भिल्लवस्ती, पारधी वस्ती, – घनसावंगी शहर, कैकाडी वस्ती मांदळा रोड, घनसावंगी, कैकाडी वस्ती भावनगर, घनसावंगी शहर  या परिसरातील संबंधित भटके-विमुक्त वस्त्यांमध्ये, 28 सप्टेंबर रोजी कैकाडी वस्ती, पारडगांव येथे, तर 29 सप्टेंबर रोजी कैकाडी वस्ती, रांजणी तसेच धनगर वस्ती, रांजणी येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मंठा तालुका : 27 सप्टेंबर रोजी कैकाडी वस्ती, मंठा येथे, 28 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, मंठा येथे, तर 29 सप्टेंबर रोजी धनगर वस्ती, तळणी येथे शिबिर होणार आहे.

परतूर तालुका : 27 सप्टेंबर रोजी वडार वस्ती येथे, 28 सप्टेंबर रोजी शिकलकरी वस्ती, परतूर येथे, तर 29 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, आष्टी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भोकरदन तालुका : 27 सप्टेंबर रोजी नाथगोसावी वस्ती, भोकरदन, गोसावी समाज वस्ती फत्तेपूर (शिबीर नाथगोसावी येथे) भोकरदन परिसरात, 28 सप्टेंबर रोजी पारधी वस्ती व लबानवस्ती-  राजुर, परिसरात तर 29 सप्टेंबर रोजी तसेच बंजारा/ वस्ती, तपोवन, गोसावी वस्ती  - मोतीनगर  तपोवन परिसर येथे शिबिर होणार आहे.

जाफ्राबाद तालुका : 27 सप्टेंबर रोजी वडार वस्ती, गोंधळी वस्ती व धनगर वस्ती, खासगांव येथे, 28 सप्टेंबर रोजी गोसावी वस्ती, माहोरा येथे, तर 29 सप्टेंबर रोजी वडार वस्ती, जाफ्राबाद तसेच भोई वस्ती, जाफ्राबाद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिबिरापूर्वी वस्तीस्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तात्काळ वाटप करण्यावर भर देण्यात येणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी संबंधित शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

जिल्ह्यातील नियोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्र्वविक्रमी रोजगार महाकुंभ” स्थगित

 


जालना दि.24 (जिमाका) :महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ स्थगित करण्यात आला आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना तसेच मॉडेल करिअर सेंटर, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी या रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

रोजगार महाकुंभाची नवीन तारीख आणि कार्यक्रमाचे वेळापत्रक योग्य वेळी प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी दिली.दरम्यान, रोजगाराच्या शोधात असलेले युवक-युवती, नोकरी इच्छुक उमेदवार, नियोक्ते, औद्योगिक आस्थापना तसेच संबंधित घटकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन  सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

अंगारकी चतुर्थी निमित्त वाहतुक मार्गात बदल

 

 


 

जालना दि.24 (जिमाका) :पोलीस ठाणे हसनाबाद हद्यीतील मौजे राजूर ता. भोकरदन येथे दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणपती दर्शनासाठी मोठया प्रमाणावर भाविक मराठवाडा, खान्देश, विदर्भ येथून येतात. तसेच जालना शहरातून व भोकरदन, जाफ्राबाद भागातून मोठ्या प्रमाणावर स्त्रिया, पुरुष, अबालवृध्द, लहान मुले पायी दर्शनासाठी येतात. तसेच नमुद तिर्थक्षेत्र स्थळास महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे.

 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये  पोलीस अधीक्षक, तेघबीर सिंह संधू,  यांना प्राप्त  अधिकारान्वये  आदेशीत करीत आहेत. पोलीस ठाणे हसनाबाद हद्यीतील मौजे राजूर ता. भोकरदन येथे दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणपती दर्शनासाठी येणारे भाविकांची गैरसोय होवू नये तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी व वाहतुकीची कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी म्हणून या दृष्टीकोनातून राजूर ता. भोकरदन कडे जाणारे व येणारे वाहनांचे वाहतुकीत अंशतः बदल करण्यात येत आहे.

वळविण्यात आलेल्या वाहतुकींचे मार्ग

भोकरदन चौफुली जालना येथून राजुर, भोकरदनकडे जाणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) देऊळगांव राजा, जाफ्राबाद, माहोरा मार्गे भोकरदनकडे जातील व येतील.

भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयापासून राजुर मार्गे जालना कडे येणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) माहोरा, जाफ्राबाद, देऊळगांव राजा या मार्गाने जालना कडे जातील व येतील.

दाभाडी कडून राजूर मार्गे भोकदनकडे जाणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) हसनाबाद मार्गे भोकरदनकडे जातील व येतील.

टेंभुर्णीकडून राजूर मार्गे जालनाकडे येणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) देऊळगाव राजा मार्गे जालनाकडे जातील व येतील.

टेंभुर्णीकडून राजूर मार्गे भोकरदनकडे जाणारे जड वाहनधाक हे (भक्तांची वाहने वगळून) जाफ्राबाद-माहोरा मार्गे भोकरदन कडे जातील व येतील.

वरील मार्गाची जड वाहतुक दि. 28 सप्टेंबर 2026  रोजीच्या 2.00 वाजेपासुन दि. 30 सप्टेंबर 2026 रोजीच्या 2.00वाजेपर्यंत बदल करण्यात आलेला आहे. तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी.

हा  आदेश 28 सप्टेंबर 2026  रोजीच्या 2.00 वाजेपासुन दि. 30 सप्टेंबर 2026 रोजीच्या 2.00वाजेपर्यंत अंमलात राहील.

-*-*-*-*-

 

सेवा संकल्प अभियानांतर्गत धनगरवाडी शाळेत वृक्षारोपण विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 




जालना दि.24 (जिमाका) : सावरगाव हडप, सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी, केंद्र सावरगाव येथे ‘वृक्षारोपण अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन तसेच वृक्षांच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

या कार्यक्रमात डॉ. भरत वानखेडे, विस्तार अधिकारी (शिक्षण) तसेच केंद्रप्रमुख विकास बनकर, केंद्र सावरगाव हडप यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणानंतर लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.

 

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करून ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हा संदेश देण्यात आला.

 

-*-*-*-*-

 

 

 

 

 

Wednesday, 23 September 2026

 

सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणाला डॉ.पी.पी.डोके यांची भेट देऊन पडताळणी.

 


जालना,दि.23(जिमाका) : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रांचे बळकटीकरण व ग्रामीण जनतेपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care) प्रशिक्षणाचे दोन दिवसीय आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र वरुड (बु) येथे करण्यांत आले होते. सदरील प्रशिक्षणाला माजी संचालक डॉ. पी.पी.डोके यांनी भेट देऊन प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करुन सदरील प्रशिक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.                                                                                                                                                           

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वृध्दींगत व कौशल्यपुर्ण करुन नागरिकांना प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक अशा सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करुन देणे हा आहे. या प्रशिक्षणामध्ये विविध स्किलद्वारे सैध्दांतिक व प्रात्यक्षिक स्वरुपात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये १३ प्रकारच्या सेवा बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गरोदरपणा, प्रसुती व प्रसुतीपश्चात काळजी, नवजात शिशु व अर्भक, बालक व किशोरवयीन, कुटूंब कल्याण व प्रजनन आरोग्य सेवा, संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण, असंसर्गजन्य रोगांची माहिती व व्यवस्थापन (उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग) नेत्र, कान नाक घसा, मौखिक, मानसिक आरोग्य, वृध्दांची काळजी व उपशामक वेदना व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार, आरोग्य संवर्धन, योग व जनजागृती इ.बाबत आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, व आशा कार्यकर्ती यांना सविस्तर प्रशिक्षण व मार्गदर्शन या प्रशिक्षणांच्या माध्यमातुन देण्यात आले.

जिल्हा परिषदेची साथ व आरोग्य कर्मचाऱ्यांची मेहनत यांच्या बळावर जालना जिल्हा आरोग्य संपन्न बनविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणुन डॉ. अश्वमेध जगताप, डॉ. बेबीसरोज घोलप (स्त्री रोग), डॉ. प्रज्ञा कुलकर्णी (स्त्री रोग), डॉ. प्रशांत बांदल (भिषक), डॉ. बेरकर (बालरोग), श्री. भुतेकर ए.डी., संतोष जाधव, मच्छिंद्र बदर, उर्मिला वळसे, संगिता पाखरे, जनाबाई जगताप यांनी सहकार्य केले.

 

 

 

****

घाणेवाडी तलाव परिसरात 200 मीटर प्रतिबंधात्मक आदेश

 

जालना,दि.23 (जिमाका) : आगामी श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील घाणेवाडी तलाव परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

श्री गणेश विसर्जन 25 सप्टेंबर 2026 रोजी असल्याने काही गणेश मंडळांकडून घाणेवाडी तलावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच घाणेवाडी तलावातून जालना शहराला पाणीपुरवठा होत असल्याने तेथे श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्यास संबंधित ग्रामस्थांकडून विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना माहिती देऊन करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

हा आदेश 25 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 26 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जालना जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

****

गणेश विसर्जनासाठी जालन्यात वाहतूक मार्गात बदल

 

25 सप्टेंबर रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश

 

   जालना,दि.23 (जिमाका) : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात दि. 25 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक मार्गाने काढण्यात येणार आहे. या काळात मिरवणुकीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये आदेश जारी केला आहे.

आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा–टांगा स्टँड–सराफा बाजार–पाणीवेस–सुभाष चौक या मार्गावरून जुन्या जालन्याकडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओम हॉस्पिटल, मंगल बाजार, चमन बाजार, राजमहल टॉकीजजवळील पुलावरून ग्लोबल गुरुकुल शाळेजवळून बायपास रोडने अंबड चौफुली, नूतन वसाहत मार्गे वळविण्यात येणार आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा–बडीसडक–सराफा बाजार–जवाहर बाग चौकी–रहेमान गंज मार्गे जुना मोंढा या मार्गावरील वाहतूक शिवाजी महाराज पुतळा, जिजामाता प्रवेशद्वार, जेईएस कॉलेज, बाबुराव काळे चौक, रहेमान गंज मार्गे वळविण्यात येणार आहे.

नवीन जालना–सदर बाजार परिसर–रहेमान गंज–मुर्गी तलाव परिसर–जवाहर बाग चौकी परिसरातील वाहतूक मामा चौक व सुभाष चौक मार्गे जुन्या जालन्याकडे जाण्यासाठी जुना मोंढा कमान, दीपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कड कोट, शिशटेकडी मार्गे वळविण्यात येणार आहे.

बसस्थानकाकडून येणारी वाहतूक सुभाष चौक, पाणीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाताना बसस्थानक, दीपक वाईन शॉप, जुना मोंढा कमान, मुरगी तलाव, बाबुराव काळे चौक, जेईएस कॉलेज, जिजामाता प्रवेशद्वार मार्गे वळविण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनकडून मंमादेवी मार्गे गांधी चमन व मंमादेवी मार्गे नवीन जालन्यात जाणारी वाहतूक नूतन वसाहत, अंबड चौफुली व मंठा चौफुली मार्गे वळविण्यात येणार आहे.

याशिवाय छत्रपती संभाजीनगरकडून जालना मोतीबाग मार्गे अंबड, रेवगाव, घनसावंगी, मंठा, सिंदखेडराजाकडे जाणारी वाहतूक ग्रेडर टी पॉइंट, राजूर चौफुली, नवीन मोंढा, कन्हैया नगर मार्गे बायपास रोडने वळविण्यात येणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे. वरील आदेश दि. 25 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 7 वाजेपासुन श्रीगणेश विसर्जन होईपर्यंत अंमलात राहिल असे आवाहन करण्यात आले आहे.

 

****

Tuesday, 22 September 2026

आता जालन्याच्या लेकी घेणार आकाशात भरारी! ✈️ महिला कमर्शियल पायलट घडविण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा पुढाकार

 


जालना,दि.22 (जिमाका) : “मुलींनी केवळ मोठी स्वप्ने पाहू नयेत, तर ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठही मिळाले पाहिजे” या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यातील होतकरू मुलींसाठी विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरची नवी दारे खुली करण्याचा पुढाकार जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल (भा.प्र.से.) यांनी घेतला आहे. श्रीमती मित्तल या सध्या जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने IndiGoReach यांच्या “Giving Wings to Fly – Shaping the Future of Indian Women in Aviation” या उपक्रमाअंतर्गत जालन्यातील पात्र युवतींना Commercial Pilot म्हणून करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

24 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील DPC Hall येथे हा कार्यक्रम होणार आहे. 18 ते 35 वयोगटातील भारतीय महिला उमेदवारांसाठी ही संधी असून, 10+2 मध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांत प्रत्येकी किमान 51 टक्के गुण तसेच लागू EWS उत्पन्न निकष आवश्यक आहेत. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना Commercial Pilot Licence (CPL) आणि ATR Type Rating Training, प्रशिक्षणादरम्यान निवास व भोजनासाठी 100 टक्के सहाय्य, वैद्यकीय विमा तसेच पायलट मेंटॉरशिप आणि करिअर मार्गदर्शनाचा समावेश असल्याचे कार्यक्रमाच्या माहितीत नमूद आहे.

या उपक्रमामागील व्यापक उद्देश म्हणजे जालना जिल्ह्यातील मुलींना पारंपरिक करिअरच्या पलीकडे पाहण्याची प्रेरणा देणे आणि विमान वाहतूक क्षेत्रासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी संधीची दारे खुली करणे.

“आपल्या मुलींनी विमानात केवळ प्रवासी म्हणूनच नव्हे, तर त्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट म्हणूनही बसावे. आर्थिक किंवा सामाजिक परिस्थिती त्यांच्या स्वप्नांच्या आड येऊ नये. जालन्यातील मुलींनी आत्मविश्वासाने आकाशाला गवसणी घालावी, हीच या उपक्रमामागची भावना आहे.”

                                                               जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’पासून आता ‘बेटी को पायलट बनाओ’कडे एक नवे पाऊल — जालन्याच्या मुलींच्या स्वप्नांना आता खऱ्या अर्थाने पंख मिळणार आहेत! जालन्याची लेक… आता आकाश तिचे! ✈️

-*-*-*-*-*-*-

जालन्यातील मुलींना कमर्शियल पायलट होण्याची संधी

 


 

जालना, दि.22 (जिमाका) : जालना जिल्ह्यातील होतकरू मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून ‘IndiGoReach’च्या ‘Giving Wings to Fly – Shaping the Future of Indian Women in Aviation’ या उपक्रमांतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम 24 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील DPC Hall येथे होणार आहे. या कार्यक्रमातून पात्र युवतींना कमर्शियल पायलट म्हणून करिअर करण्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या संधीची माहिती दिली जाणार आहे.

 

या योजनेसाठी 18 ते 38 वयोगटातील भारतीय महिला उमेदवार पात्र आहेत. बारावीमध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांत प्रत्येकी किमान 51 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच लागू असलेले EWS उत्पन्न निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या पात्र उमेदवारांना Commercial Pilot Licence (CPL) आणि ATR Type Rating Training देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीत निवास व भोजनासाठी १०० टक्के सहाय्य, वैद्यकीय विमा, पायलट मेंटॉरशिप आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मुलींना पारंपरिक करिअरच्या पलीकडे जाऊन विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळावी आणि त्यांचा या क्षेत्रातील सहभाग वाढावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे मुलींच्या स्वप्नांना मर्यादा येऊ नयेत, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

“जालन्यातील मुलींनी विमानात केवळ प्रवासी म्हणून नव्हे, तर कॉकपिटमध्ये पायलट म्हणूनही बसावे. त्यांनी आत्मविश्वासाने आकाशाला गवसणी घालावी,” अशी भावना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केली आहे.

-*-*-*-*-*-*-

अवैध मुरूम वाहतूक करणारा टिप्पर व रेती उत्खनन करणारे जेसीबी जप्त; जाफ्राबाद तालुक्यात महसूल प्रशासनाची कारवाई

 




जालना, दि.22 (जिमाका) : जाफ्राबाद तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाई करत मौजे गोंधनखेडा येथून अवैध मुरूम वाहतूक करणारा एक टिप्पर, तसेच काळेगाव (बोबडेवाडी) येथून अवैध रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले.

 

जाफ्राबाद तालुक्यातील मौजे गोंधनखेडा परिसरात अवैधरीत्या मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत संबंधित एक टिप्पर जप्त केला.

 

तसेच काळेगाव (बोबडेवाडी) परिसरात अवैधरीत्या रेती उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने तेथे कारवाई करून रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी मशीन ताब्यात घेतले.

 

पकडण्यात आलेली दोन्ही वाहने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन, टेम्भूर्णी यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 

जालना, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यात दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी श्रीगणेश विर्सजन/अनंत चतुर्दशी, दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रपिता महात्मागांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती, सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहे. या सण, उत्सव, जयंतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

तसेच जिल्ह्यामध्ये विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यांच्या तसेच आरक्षण बचावाच्या अनुषंगाने तसेच शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी उपोषणे, आंदालने, मोर्चे, धरणे इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. या मागण्यांच्या अनुषंगाने भविष्यातही विविध स्वरुपाची आंदोलने, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.4 ऑक्टोबर 2026  रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-    

कडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

        जालना, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतक-यांना कडधान्य विक्रीच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काहीतरी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट (Mini Dal Pulses Mill, Semi-Automatic Pulses Dal Mill Fully Automatic Pulses/Dal Mill) स्थापन करण्यास अर्ज दि. 28 जानेवारी 2026 अखेरपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावे, सदर योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था (FPO), क्लस्टर स्तर महासंघ (CLF), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती/संस्था यांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे.

पात्र लाभार्थी घटक- योजनेअंतर्गत खालील घटकांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल;शेतकरी उत्पादक संस्था (FPOS), क्लस्टर स्तर महासंघ (CLFs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), वैयक्तिक कोणत्याही अधिनियमांर्तगत

 

नोंदणीकृत इतर उपक्रम पात्रता निकष : गट लाभार्थी (FPO/Cluster Level Federation (CLFs) Primary Agricultural Credit Societies (PACS)-संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षापासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असावी. प्रकल्प खर्चाच्या किमान 15% रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता असावी.

वैयक्तिक लाभार्थी

अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे. एका कुटुंबातील (स्वतः, पती/पत्नी व अविवाहित मुले) केवळ एका व्यक्तीस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. प्रकल्प खर्चाच्या किमान 15% रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता असावी

अनुसूचित जाती/जमाती, महिला, डोंगराळ क्षेत्रे व आकांक्षी जिल्हे यांना प्राधान्य असेल.

अर्थसहाय्य प्रमाण प्रकल्प खर्चाच्या 33% किया कमाल रु. 25 लाख प्रति युनिट (यापैकी जे कमी असेल ते). अनुदान केवळ यंत्रसामग्री (Plant & Machinery) खरेदी तसेच इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधा बांधकामासाठी दिले जाईल. जमीन, वीज, मनुष्यबळ इत्यादी खर्चासाठी अनुदान देव राहणार नाही. तसेच, इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी अनुदानाचा जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या 30% पर्यंत असेल (म्हणजे प्रकल्प खर्चाच्या 33% किवा 25 लाख, यापैकी जे कमी असेल ते). सदर सहाय्य हे अनुदान स्वरूपात असून उर्वरित रक्कम अर्जदाराने मार्जिन मनी/बैंक कर्जाद्वारे उभारणे आवश्यक राहील.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थी यांनी आपलेतालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कार्यवाही करण्यात यावी. असे आवाहन जि. आर. कापसे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

Monday, 21 September 2026

गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

 



 

अंबड येथील श्री छत्रपती गणेश मंडळ आणि पारनेर येथील रामराज्य प्रतिष्ठान गणेश मंडळ येथे लोकसंवाद संपन्न

 

जालना,दि.21(जिमाका) :राज्य शासनामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गतच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे हा या ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचा उद्देश आहे.

 

गणेशोत्सवाचे निमित्ताने आज दि. 21 सप्टेंबर रोजी अंबड येथील छत्रपती शिवाजी महाराज हाउसिंग सोसायटी हाऊसिंग सोसायटीतील श्री छत्रपती गणेश मंडळ आणि अंबड तालुक्यातील पारनेर येथील रामराज्य प्रतिष्ठान गणेश मंडळ येथे आज लोकसंवाद-2026 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य, पशुसंवर्धन आणि महिला बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांनी देण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी यावेळी आरोग्य विभागातील योजनांची माहिती दिली. तर महिला बाल विकास विभागाचे जिल्हा प्रकल्प समन्वय संतोष दाभाडे व जिल्हा समन्वयक आकाश भवर, तसेच पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस यु तांगडे यांनी माहिती दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल जाधव, मंजीत रामभाऊ गाडेकर यांच्यासह या कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती. सदरील लोकसंवाद कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच नागरिकांच्या शंका निराकरण करण्यात आले.

 

****

जालन्यात २० क्विंटल तांदूळ जप्त; काळ्या बाजारात विक्रीचा संशय




जालना,दि.21(जिमाका) : जालना शहरातील औरंगाबाद चौफुली परिसरात लेकवूड हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून सुमारे २० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या तांदळाची अंदाजे किंमत ८० हजार रुपये आहे. सदर धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे २० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये ५० किलो वजनाचे एकूण ४५ तांदळाचे कट्टे आढळून आले. या तांदळाचे एकूण वजन अंदाजे २० क्विंटल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशयावरून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी आशीमा मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश थेरे, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय जालना आणि जिल्हा पुरवठा कार्यालयातील तहसीलदार सचिन यादव तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी (पुरवठा) महेश थेरे यांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा क्रमांक ०५२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सदाशिव विनायक राठोड करीत आहेत.

 

****

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतला जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा



 

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्या

– जालना पालकमंत्री पंकजाताई मुंडे

 

- जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांचे लेखापरीक्षण करावे

- चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा

 

जालना,दि.21(जिमाका) : जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिले.

 

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेतला. यावेळी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया, अप्पर जिल्‍हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील धरणे, तलाव, विहिरी, लघुपाटबंधारे आणि अन्य नैसर्गिक जलस्रोतांतील पाणीसाठ्याचे लेखापरीक्षण पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना दिले.

जायकवाडी प्रकल्पातून होणाऱ्या उचल पाणीपुरवठ्याची स्थिती आणि अंबड व जालना शहरांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा कालावधी यांचा अचूक अंदाज घ्यावा. सध्याचा पाणीसाठा मार्चपर्यंत पुरण्याची शक्यता असली, तरी पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी उपलब्ध न झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून पर्यायी नियोजन करावे, असे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केले.

 

पालकमंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, महानगरपालिका, नगरपंचायती, मोठ्या ग्रामपंचायती तसेच दुर्गम व डोंगराळ गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आतापासून निश्चित करावेत. या स्रोतांतील पाणीसाठ्याचे नियमित निरीक्षण करून आवश्यकतेनुसार पर्यायी स्रोत तयार ठेवावेत. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शेती, उद्योग, मोठी बांधकामे आणि अन्य पाणीखाऊ वापरांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करावा.

 

टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पारदर्शक आणि परिणामकारक ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. प्रत्येक टँकरला जीपीएस प्रणाली जोडून पाणी प्रत्यक्ष गरजू नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री करावी, असे पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.

 

- चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा

जालना जिल्ह्यातील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा आणि संभाव्य तूट यांचा समावेश असलेला स्वतंत्र चारा कृती आराखडा तयार करावा. चारा डेपो अथवा चारा छावण्यांची आवश्यकता, जिल्ह्याची चारा स्वयंपूर्णता आणि अतिरिक्त चारा मिळविण्याचे स्रोत निश्चित करावेत. शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून तेथील चारा उपलब्धतेचा अभ्यास करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

 

पाणी उपलब्ध असलेल्या भागांतील शेतकऱ्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. गाळपेरा क्षेत्रांचा चारा उत्पादनासाठी उपयोग करण्याची व्यवहार्यता तपासून त्याबाबतचा निर्णय प्रस्ताव तयार करावा. चारा छावण्या अथवा अन्य उपायांसाठी राज्यस्तरीय निर्णय आणि निधीची आवश्यकता असल्यास शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे पालकमंत्री पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.

 

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी आणि चारा या विषयांवर केंद्रित स्वतंत्र बैठक २८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी जलस्रोतांचे लेखापरीक्षण, चारा नियोजन, संभाव्य पाणीटंचाईची गावे आणि आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती तयार ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, सर्व जलस्रोतांचे लेखापरीक्षण करून संभाव्य पाणीटंचाईची ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल. तसेच पिण्याचे पाणी व चारा उपलब्धतेवर विशेष लक्ष केंद्रित करून शेजारील जिल्ह्यांशी समन्वय साधण्यात येईल. जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक पूर्वनियोजन करून उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्व पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांची उपलब्धता व सद्यःस्थितीची माहिती संकलित करून ठेवावी. तसेच, पिक कापणी प्रयोगाच्या आधारेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी पिक कापणी प्रयोग गांभीर्याने व अचूकपणे पूर्ण करावेत. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी टंचाईसंदर्भात बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांचे पूर्वनियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

 

****

 

Sunday, 20 September 2026

गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-2026’; शासकीय योजनांची नागरिकांना माहिती

 



 

 

 

जालना, दि.20(जिमाका)  : राज्य शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 17ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

या उपक्रमाचा मुख्य उद्देश गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम आणि विभागीय कार्यक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. त्याच अनुषंगाने आज दि. २० सप्टेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील फुलेनगर येथील भोलेश्वर युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या ठिकाणी ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमात आरोग्य, कृषी तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची नागरिकांना माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाच्या विविध योजना, नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्यविषयक सुविधा आणि शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी दिली.

 

तसेच महिला व बाल विकास विभागाचे अंमलबजावणी सहाय्यक अधिकारी बी. बी. राठोड यांनी महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. यावेळी नागरिकांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती दिली.

 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांच्या अडचणी व शंकांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी दिसून आले.

 

कार्यक्रमास भोलेश्वर युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर सुधाकर खैरे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

-*-*-*-*-*-*-