Thursday, 27 August 2026

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेळो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ उत्साहात संपन्न


जालना,दि.27(जिमाका) : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत, जालना यांच्या सहकार्याने जी.ई.एस. महाविद्यालय, जालना येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘खेळो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडाप्रेमी तसेच युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी व्हिडिओ संवाद साधून केलेले मार्गदर्शन. आपल्या संवादातून त्यांनी युवकांना खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता जीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले. नियमित क्रीडा सहभागामुळे शरीर सुदृढ राहण्यासोबतच शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना आणि संघर्ष करण्याची क्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले. युवकांनी खेळाच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेशही त्यांनी दिला.

जी.ई.एस. महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अत्रेहोत्री, उपप्राचार्य डॉ. उमेश मोगले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुमंत बिक्कड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. किशोर कुमार तापडिया, डॉ. हेमंत वर्मा यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विविध विभागांचे प्राध्यापक, क्रीडा विभागाचे पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान युवकांना क्रीडा क्षेत्रातील विविध संधी, खेळाडू म्हणून घडताना येणारी आव्हाने आणि क्रीडेमुळे व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणारी चालना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद उत्साहाने ऐकला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी नव्या उमेदीची भावना निर्माण झाली.

कार्यक्रमानंतर खो-खोच्या राष्ट्रीय खेळाडू गायत्री शिंदे तसेच इतर खेळाडूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या क्रीडा प्रवासातील अनुभव, सरावातील सातत्य, स्पर्धेतील आव्हाने आणि यशासाठी आवश्यक असलेली मेहनत याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘खेळा, निरोगी राहा आणि देशाच्या विकासात योगदान द्या’ हा संदेश देण्यात आला. क्रीडा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती मिळाल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वयंसेवक, मेरा युवा भारतचे पदाधिकारी तसेच युवक मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

****

No comments:

Post a Comment