ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठीच्या “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण” या युनिसेफ कार्यक्रमाला भेट
जालना,दि.20(जिमाका)
: युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आणि
आयुष्मान खुराना प्रसिद्ध अभिनेते यांनी (दि. 19) रोजी जालना येथे भेट देऊन, ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम
झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी
व संरक्षण” या युनिसेफ कार्यक्रमाला भेट देऊन मुले आणि उपस्थितांशी संवाद साधला.
खुराना यांच्यासोबत
युनिसेफ इंडियाच्या
पथकात उप प्रतिनिधी (कार्यक्रम) यास्पर मोलर यांचा समावेश होता. या मोहिमेला राज्य सरकार आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य आहे.
अनेक उपेक्षित कुटुंबांसाठी, आर्थिक अडचणींमुळे हंगामी स्थलांतर ही वास्तविकता आहे. यामुळे मुलांसाठी बालमजुरी, बालविवाह, शिक्षणात खंड, कौटुंबिक दुर्लक्ष आणि हिंसाचाराचा धोका वाढू शकतो. पालकांच्या
अनुपस्थितीत काही वेळा विस्तारित कुटुंबासह किंवा आजी-आजोबांसोबत मागे राहणारी मुले शाळेत जातात
किंवा त्यांना आरोग्य सेवाही मिळतात. परंतु, त्यांना अनेकदा भावनिक पाठिंबा
मिळत नाही, घरातून दुर्लक्ष होण्याची
शक्यता वाढते आणि घरगुती जबाबदाऱ्या अंगावर पडतात.
या समस्यांचे निराकरण करणाऱ्या आणि हिंसाचार, अत्याचार, शोषण व कौटुंबिक दुर्लक्ष रोखण्यासाठी तसेच बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी युनिसेफ भारत सरकारसोबत काम करते. जालन्यात, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या
सहकार्याने “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी
व संरक्षण” (किनशिप अँड कम्युनिटी केअर) कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक रहिवासी आणि सरकार यांनी एकत्र काम केल्यामुळे
स्थलांतरित पालकांच्या मुलांसाठी सुरक्षित वातावरण, शिक्षणात खंड न पडणे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. तसेच आरोग्यसेवा, पोषण व मानसिक-सामाजिक आधार यांसारख्या सेवाही
मुलांसाठी उपलब्ध झाल्या असून बालमजुरी आणि बालविवाहाचा धोकाही कमी होण्यास मदत झाली आहे.
"हंगामी, आर्थिक अडचणींमुळे होणारे स्थलांतर हा स्वखुशीने निवडलेला पर्याय नसून अनेक कुटुंबांसाठी ते
कठोर वास्तव आहे," असे मत आयुष्मान खुराना
यांनी मुले आणि स्थानिक सदस्यांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केले. "कोणत्याही मुलाला त्याच्या आवाक्यात
नसलेल्या परिस्थितीमुळे आपले बालपण गमवावे लागू नये. जालन्यात, मी स्थानिक रहिवाशांना एकत्र येऊन स्थलांतरामुळे प्रभावित झालेल्या मुलांना संरक्षण देताना आणि त्यांना कुटुंबाशी जोडून घेऊन काळजी घेताना
पाहिले. हा कार्यक्रम केवळ सुरक्षित घर पुरवत नाही तर नातेसंबंधही जपतो, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो
आणि मुलांना उज्ज्वल भविष्याची आशा देते."
खुराना यांनी शंकर आसाराम या तरुण समुदाय नेत्याची भेट घेतली. शंकर यांनी युवा स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामामुळे त्यांना स्थानिकांचा विश्वास संपादन
करता आला. त्यांच्या कामामुळेच आज ते एका
गावाचे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. खुराना
यांनी बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि बालमित्र असलेल्या प्रतिक्षा हिचीही भेट घेतली. प्रतिक्षाने स्थलांतराचा किशोरवयीन मुलींवर होणारा परिणाम प्रत्यक्ष पाहिला आहे.
"बालमित्र हे मुलांसाठी आणि स्थानिकांसाठी
विश्वासार्ह आणि उत्तम आदर्श आहेत. मुलांचे हक्क, सुरक्षितता आणि कल्याण तसेच
मुलांच्या शिक्षणात खंड न पडण्यासाठी, बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यासाठी ते मदत करतात. त्यामुळे प्रत्येक मुलाला शिकण्याची आणि यशस्वी होण्याची
संधी मिळते. भारतात मुलांच्या संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) सारखे
मजबूत कायदे आहेत. या वर्षी या कायद्याला दहा वर्षे पूर्ण होत
आहेत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संरक्षणात्मक उपाय हंगामी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसह प्रत्येक मूल आणि इतर कुटुंबापर्यंत प्रत्यक्षात पोहोचतील याची खात्री करणे," असे आयुष्मान खुराना म्हणाले.
ग्रामपंचायती आणि आघाडीच्या सेवा पुरवठादारांना एकत्र आणून, हा कार्यक्रम मुलांसाठी एक सामाजिक
सुरक्षा तयार करतो. त्या माध्यमातून मुलांना शिक्षण, आरोग्यसेवा, पोषण आणि मानसिक-सामाजिक आधार दिला जातो. गावपातळीवर हा कार्यक्रम मुलांना कसा आधार देतो हे समजून घेण्यासाठी खुराना यांनी किशोरवयीन मुली, मुले आणि काही कुटुंबांची भेट घेतली.
किशोरवयीन मुलींशी झालेल्या संवादाबद्दल बोलताना खुराना म्हणाले की, "मी १८ वर्षांच्या शिल्पाला भेटलो. तिला
कुटुंबासोबत स्थलांतराचा अनुभव आहे. पण आज तिने शालेय शिक्षण पूर्ण करून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. तिचे शिक्षणच तिला हंगामी स्थलांतराचे पिढ्यानपिढ्या चालणारे चक्र मोडण्यास मदत करू शकेल अशी आशा आहे. शिक्षणासाठी योग्य,
निरोगी आणि सुरक्षित वातावरणात दिल्यास मुलींची स्वप्ने नक्की पूर्ण होऊ शकतात."
पालकांच्या स्थलांतरानंतर आजोबा आपल्या दोन नातवंडांची
काळजी घेत असलेल्या एका कुटुंबाचीही खुराना यांनी
भेट घेतली. बालमित्र आणि स्थानिकांच्या मदतीने ही मुले शाळेत जातात. त्यामुळे आरोग्याशी
संबंधित पोषण व लसीकरण सेवाही त्यांना मिळतात.
आपल्या भेटीबद्दल सांगताना खुराना म्हणाले की, "प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरणात वाढण्याचा हक्क आहे. सरकार मुलांच्या संरक्षणासाठी कायदे आणि योजना तयार करते. त्याचवेळी युनिसेफ, महाराष्ट्र सरकार, जिल्हा प्रशासन आणि गावातील रहिवासी एकत्र येऊन प्रत्येक मूल सुरक्षित राहील
यासाठी काळजी घेताना पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो."
"सर्वाधिक असुरक्षित मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण पुरवण्यात जालना जिल्हा प्रशासनाला साथ देताना युनिसेफला आनंद
होत आहे," असे युनिसेफ इंडियाचे यास्पर मोलर म्हणाले. "मुलांवरील हिंसाचार रोखला जाऊ शकतो. बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ ला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अशावेळी मुलांच्या
आयुष्यात असलेले धोके वेळीच ओळखणे आणि कुटुंबांना आवश्यक सेवा देणे गरजेचे आहे. तसेच मुलांना सामाजिक संरक्षणाशी जोडण्यासाठी व्यवस्था अधिक बळकट करणेही महत्त्वाचे आहे. या कामासाठी सहकार्य
देणाऱ्या आणि प्रत्येक मुलाच्या सुरक्षितता व काळजी या हक्कांसाठी पुढाकार घेणाऱ्या आयुष्मान खुराना यांचेही युनिसेफ मनःपूर्वक कौतुक करते."
यावेळी अभिनेते आयुष्यमान खुराना
आणि युनिसेफ
इंडियाच्या यास्पर
मोलर यांनी
जालना जिल्हाधिकाऱी आशिमा मित्तल यांची
भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी
जालना
जिल्ह्यात युनिसेफच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘बालमित्र’ उपक्रमाची माहिती
दिली. तसेच या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात
कायम ठेवणे असल्याचे सांगितले. ऊसतोडणी किंवा मजुरीसाठी पालक स्थलांतरित झाल्यानंतर
काही मुले गावात आजी-आजोबा किंवा नातेवाईकांकडे राहतात. त्यावेळेस ‘बालमित्र’ हे युवा
स्वयंसेवक अशा मुलांना शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि मानसिक आधार देत असल्याची माहिती
दिली.
****
No comments:
Post a Comment