जालना,दि.31 (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या निर्देशानुसार 31 ऑगस्ट हा ‘भटके विमुक्त
दिवस’ म्हणून जालना येथे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रमांनी
उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण अनिता राठोड, प्रा. बी. वाय. कुलकर्णी, प्रा. अंकुश चव्हाण,
विकास राठोड, विष्णुगिरी, अशासकीय सदस्य मुकेश भारद्वाज, मागास बहुजन कल्याणचे
सहाय्यक संचालक यांची उपस्थिती होती.
यावेळी मुलांचे व मुलींचे शासकीय
वसतिगृह येथे आरोग्य तपासणी शिबिर, व्याख्याने व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात
आले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन
गौरविण्यात आले. तसेच भटके विमुक्त जाती-जमातींच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी
झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भटके
विमुक्त समाजाची संस्कृती, जीवनमूल्ये व परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत
पोहोचविण्यासाठी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये
सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य तपासणी, आधारकार्ड
नोंदणी, जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची
माहिती देण्यासाठी शिबिरे आयोजित करण्याबाबत संबंधित विभागांना कळविण्यात आले.
मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक
अनंत कदम यांनी यावेळी ‘भटके विमुक्त दिवस’चे महत्त्व विशद करून विभागामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश बहिर
यांनी केले. श्रीमती स्नेहल सोनावळे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या
विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या
बोलीभाषेत मनोगत व्यक्त केले. प्रा. अंकुश चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन
केले, तर मुख्य वक्ते प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी भटके विमुक्त समाजाचा इतिहास,
संस्कृती, सामाजिक परिस्थिती तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत सखोल मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्ही. के. चव्हाण यांनी केले.
बंजारा समाजाची सांस्कृतिक ओळख असलेल्या
पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमास
विद्यार्थी, पालक, अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment