Friday, 5 June 2026

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण : मतदारांना पासपोर्ट साईज छायाचित्र तयार ठेवण्याचे आवाहन

 


जालना,दि.5(जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) अभियान सुरू असून, ज्या मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नाही, अस्पष्ट आहे, जुने झाले आहे किंवा अद्ययावत करणे आवश्यक आहे, अशा सर्व मतदारांनी आपले अलीकडील पासपोर्ट साईज छायाचित्र तयार ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

मतदार यादीतील माहिती अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारांची अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी अद्ययावत छायाचित्रांची आवश्यकता भासणार आहे. मतदारांकडून घेण्यात येणाऱ्या छायाचित्रांचा वापर केवळ अधिकृत निवडणूक कामकाजासाठीच करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांच्या ओळखीची अचूकता वाढण्यास मदत होईल तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठीही हे उपयुक्त ठरणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि परिणामकारक होण्यास मदत मिळेल.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल अधिकारी (BLO) तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी क्षेत्रीय पडताळणीसाठी भेट देणार आहेत. यावेळी नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करावे, मागणी केल्यास अद्ययावत पासपोर्ट साईज छायाचित्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व मतदारांच्या सक्रिय आणि वेळेवर मिळणाऱ्या सहकार्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम नियोजित कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण होण्यास मदत होईल.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment