जालना,दि.18(जिमाका): भारत सरकारच्या सामाजिक न्याय
व अधिकारिता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाज कल्याण आयुक्तालय, पुणे आणि सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जालना यांच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत
‘विकसित भारत की पहचान’ या विशेष जनजागृती उपक्रमास बुधवार दि.17 रोजी प्रारंभ करण्यात
आला. या अभियानाच्या माध्यमातून समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करून निरोगी
व सुदृढ समाज घडविण्याचा संदेश देण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नशामुक्तीची शपथ घेत
अभियानाला सुरुवात केली. ‘विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित हा विशेष जनजागृती
सप्ताह 17 जून ते 26 जून, 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून विविध कार्यक्रमांच्या
माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागृती केली जाणार आहे. या अभियानादरम्यान
शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे, संत भगवानबाबा उसतोड कामगारांच्या मुला-मुलींचे
शासकीय वसतिगृह तसेच महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि विविध
जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा
संदेश पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड, विशेष अधिकारी (शा.नि.शा.)
स्नेहल मोवळे, समाज कल्याण निरीक्षक सुरेंद्र चितेकर, मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी
यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी
अमंली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर होणाऱ्या
दुष्परिणामांबाबत माहिती दिली. व्यसनामुळे कुटुंब व्यवस्था आणि समाजजीवनावरही विपरीत
परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः तरुण पिढीत वाढत्या व्यसनाधीनतेबाबत
चिंता व्यक्त करत या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्व स्तरांवर व्यापक जनजागृती आणि
प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या
माध्यमातून ‘नशामुक्त भारत’ घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनीही
व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजहिताच्या या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात
आले.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment