Wednesday, 10 June 2026

खरीप हंगाम 2025 पीकस्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव; एकूण 1 लाख 3 हजार रुपयांची बक्षिसे

 


 

जालना,दि.10(जिमाका): खरीप हंगाम 2025 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पीकस्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व मका या पिकांच्या उत्पादकतेची आकडेवारी तपासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.

पीकस्पर्धेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांनी अवलंबिलेल्या आधुनिक शेती पद्धती, सुधारित तंत्रज्ञान आणि उत्पादनवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा आहे. तसेच विजेत्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या पीक व्यवस्थापन पद्धती, उत्पादन खर्च नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबतची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी क्षेत्रात उत्पादनक्षमतेत वाढ घडवून आणण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय विजेते शेतकरी वगळून उर्वरित पात्र स्पर्धकांमधून तालुकास्तरीय विजेत्यांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पीकनिहाय जिल्हास्तरीय विजेते

सोयाबीन पीक

सोयाबीन गटात जालना तालुक्यातील दरेगाव येथील श्रीमती रूख्मिणी नवनाथ गोडसे यांनी हेक्टरी 40.05 क्विंटल उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील बळीराम रामनाथ काळे यांनी 40 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक मिळवून 7 हजार रुपये, तर जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील विशाल रामकिसन जायभाय यांनी 37.37 क्विंटल उत्पादनासह तृतीय क्रमांक मिळवून 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळविले.

तूर पीक

तूर पिकात बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील बळीराम रामनाथ काळे यांनी हेक्टरी 30 क्विंटल उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

मूग पीक

मंठा तालुक्यातील उमरखेडा येथील गोपाल किसनराव जाधव यांनी हेक्टरी 10.25 क्विंटल उत्पादनासह प्रथम क्रमांक मिळवून 10 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.

उडीद  पीक

उडीद पिकामध्ये मंठा तालुक्यातील तळणी येथील अरुण अपाराव सरकटे यांनी 22.50 क्विंटल उत्पादनासह प्रथम क्रमांक मिळविला असुन, त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. केहाळ वडगाव येथील मधुकर पांडुरंग राठोड यांनी 21.90 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक त्यांना 7 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, तर तळणी येथील सौ. मनिषा डिगांबर सरकटे यांनी 20 क्विंटल उत्पादनासह तृतीय क्रमांक मिळविला असुन त्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

भुईमूग पीक

जाफ्राबाद तालुक्यातील डोणगाव येथील कौसाबाई दादाराव अंभोरे यांनी हेक्टरी 26.32 क्विंटल उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला असुन त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. टेंभुर्णी येथील रवि साहेबराव खरात यांनी 20.47 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक मिळविला असुन त्यांना 7 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

मका पीक

मका पिकामध्ये बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील बंडू तुकाराम वैद्य यांनी हेक्टरी 83.25 क्विंटल इतके उल्लेखनीय उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळविला असुन, त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. भातखेडा येथील सुरेश काकाजी गाडेकर यांनी 72.30 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक मिळविला असुन, त्यांना 7 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर दाभाडी येथील पुरुषोत्तम राजेंद्र जैवाळ यांनी 71.20 क्विंटल उत्पादनासह तृतीय क्रमांक पटकावला असुन, त्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय पीकस्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना एकूण 1 लाख 3 हजार रुपयांची बक्षिसे वितरित करण्यात येणार असून, त्यांच्या यशस्वी शेती पद्धती जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment