Thursday, 4 June 2026

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.4(जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा व निवृत्तीवेतन योजनांतील लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate - DLC) ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी केले आहे. यासाठी शासनाने BSA (Beneficiary Satyapan App) ही ऑनलाइन प्रणाली विकसित केली असून लाभार्थ्यांना घरबसल्या किंवा जवळच्या सेवा केंद्रांमधून हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इतर राज्य पुरस्कृत योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना BSA ॲपच्या माध्यमातून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कार्यालयीन फेऱ्या मारण्याची आवश्यकता कमी होणार असून पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. जालना तहसील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, BSA (Beneficiary Satyapan App) द्वारे लाभार्थी स्वतःचे Digital Life Certificate (DLC) ऑनलाइन तयार करू शकतात. तयार केलेले प्रमाणपत्र थेट NSAP पोर्टलवर अद्ययावत होत असल्याने लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी जलद गतीने होणार आहे.

जालना जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच वृद्धापकाळ, दिव्यांग, विधवा आणि परित्यक्ता योजनांतील लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र तातडीने सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी लाभार्थी तहसील कार्यालय, महा-ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी जाऊन DLC ऑनलाइन सादर करू शकतात.

विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इतर निवृत्तीवेतन योजनांतील अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपला मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही, त्यांनी संबंधित बँक किंवा पोस्ट कार्यालयात जाऊन तो तात्काळ लिंक करून घ्यावा. तसेच मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्यास लाभार्थ्यांना अनुदान जमा झाल्याची माहिती एसएमएसद्वारे मिळू शकते. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment