Thursday, 18 June 2026

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी ! 'मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर'वर यशस्वी उपचार;

 



जालना,दि.18(जिमाका): जिल्हा सामान्य रुग्णालय आणि नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरत असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश आले आहे. रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच स्तनांच्या कर्करोगाची अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या ऐतिहासिक टप्प्यामुळे जालना जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिल्हा रुग्णालयातील नामवंत ऑन्को-सर्जन (कर्करोग तज्ज्ञ) डॉ. अब्दुल राफे आणि त्यांच्या वैद्यकीय टिमने एका महिला रुग्णावर अत्यंत दुर्मिळ अशा 'मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर' साठीची 'मॉडिफाइड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी' ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

खासगी रुग्णालयांच्या आर्थिक लुटीतून सुटका!

यापूर्वी जालना जिल्ह्यातील सामान्य आणि गरीब रुग्णांना स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर किंवा इतर मोठ्या शहरांमधील खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत असे. यासाठी रुग्णांना लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र, आता जिल्हा रुग्णालयातच ही प्रगत शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे स्थानिक पातळीवरच गरिबांना मोफत आणि तज्ज्ञ उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रुग्णालयाची पायाभूत सुविधा सक्षम

जिल्हा सामान्य रुग्णालयाची पायाभूत सुविधा आणि आमचे मनुष्यबळ कर्करोगासारख्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया हाताळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, हे या यशाने अधोरेखित केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मी डॉ. अब्दुल राफे, भूलतज्ज्ञ, शस्त्रक्रिया गृह कर्मचारी आणि परिचारिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. सर्वसामान्य जनतेला अशाच सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही निरंतर कटिबद्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment