Wednesday, 8 July 2026

विशेष लेख कर्जमुक्तीपासून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल

 


 

शेती हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी हा त्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, बदलते हवामान, नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील सातत्याने होणारी वाढ, बाजारभावातील अनिश्चितता आणि उत्पन्नातील अस्थिरता यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. या परिस्थितीत पीक कर्ज हे शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक सहाय्य नसून शेतीच्या उत्पादन चक्राला गती देणारे महत्त्वाचे साधन ठरते. परंतु कर्जाची वेळेवर परतफेड न झाल्यास संबंधित शेतकरी बँकिंग व्यवस्थेपासून दूर जातात आणि पुढील हंगामासाठी नवीन कर्ज मिळविणे कठीण होते. अशा पार्श्वभूमीवर 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच त्यांना पुन्हा संस्थात्मक बँकिंग व्यवस्थेशी जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून समोर येत आहे.

पीक कर्जाचे महत्त्व आणि थकबाकीची समस्या

शेतीच्या प्रत्येक हंगामात बियाणे, खते, औषधे, सिंचन, मजुरी आणि यांत्रिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल बहुतेक शेतकरी पीक कर्जाच्या माध्यमातून उभे करतात. परंतु सलग दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, रोगराई किंवा उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जाची वेळेवर परतफेड करणे शक्य होत नाही.

एकदा पीक कर्ज थकीत झाल्यानंतर संबंधित कर्जखाते अनुत्पादित मालमत्ता (NPA) होण्याचा धोका निर्माण होतो. त्याचा थेट परिणाम म्हणजे शेतकऱ्यांची पतक्षमता कमी होते आणि पुढील हंगामासाठी बँकांकडून नवीन कर्ज मिळण्यास अडथळे निर्माण होतात. परिणामी अनेक शेतकरी खासगी सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्यास भाग पडतात. त्यामुळे कर्जाचे ओझे आणखी वाढून आर्थिक संकट अधिक गंभीर बनते.

कर्जमुक्ती योजनेचे व्यापक उद्दिष्ट

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतकऱ्यांचा आर्थिक पुनर्वसनाचा प्रयत्न आहे. या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांची थकीत कर्जखाती नियमित होण्यास मदत होईल. परिणामी त्यांना पुन्हा बँकांकडून पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

एकवेळ समझोता (OTS)

या योजनेतील एकवेळ समझोता (One Time Settlement - OTS) ही अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी निर्धारित अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाकडून निश्चित मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे बँकांनाही थकीत कर्जाची वसुली करण्याची संधी मिळेल आणि शेतकऱ्यांनाही आर्थिक पुनरुत्थानाचा मार्ग खुला होईल. त्यामुळे बँका आणि शेतकरी या दोघांच्याही हिताचा समतोल साधणारा हा व्यवहार्य पर्याय ठरू शकतो.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन

योजनेतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची तरतूद. अनेकदा केवळ थकीत कर्जदारांनाच लाभ मिळाल्याची भावना वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन आर्थिक शिस्त पाळणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाकडून प्रोत्साहन देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरतो.  यामुळे वेळेवर कर्जफेड करण्याची सकारात्मक मानसिकता निर्माण होईल, आर्थिक शिस्तीला बळ मिळेल आणि बँकिंग क्षेत्रात नियमित कर्जदारांची संख्या वाढण्यास मदत होईल.

बँकिंग व्यवस्थेला होणारे फायदे

या योजनेचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर बँकिंग व्यवस्थेलाही होणार आहे. थकीत कर्जाची वसुली झाल्यामुळे बँकांच्या अनुत्पादित कर्जांमध्ये (NPA) काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल आणि पात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठा करण्याची क्षमता वाढेल.

आर्थिक शिस्त

कर्जमुक्ती म्हणजे सर्व आर्थिक समस्या संपल्या असा समज करून घेणे योग्य ठरणार नाही. ही योजना शेतकऱ्यांसाठी नव्याने आर्थिक शिस्तीची सुरुवात करण्याची संधी आहे. कर्जमुक्तीनंतर पुन्हा कर्जाच्या चक्रात अडकू नये यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी पुढील बाबींवर विशेष भर देणे गरजेचे आहे.

·       पीक नियोजन आणि हवामानानुसार पीक पद्धतीचा अवलंब.

·       उत्पादन खर्चाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन.

·       पीक विमा योजनांचा नियमित लाभ.

·       उत्पन्नातून बचतीची सवय निर्माण करणे.

·       वेळेवर कर्जफेड करून पतक्षमता टिकवून ठेवणे.

·       आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढविणे.

·       बाजारपेठेतील बदलांचा अभ्यास करून योग्य वेळी विक्री करणे.

ही आर्थिक शिस्त दीर्घकालीन स्थैर्य निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी नवी ऊर्जा

कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पुन्हा आर्थिक प्रवाह निर्माण झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. शेतीसाठी आवश्यक निविष्ठांची खरेदी वाढेल, कृषी व्यवसायांना चालना मिळेल, रोजगारनिर्मितीला हातभार लागेल आणि ग्रामीण बाजारपेठेतील व्यवहारही वाढतील.

 

                                                                                                                                 अरुण सुर्यवंशी

जिल्हा माहिती अधिकारी

                                                                                                                                   जालना

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment