जालना, दि.1 (जिमाका): मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या जालना जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय म्हणून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' कडे पाहिले जात आहे. सततची नापिकी, वाढता उत्पादन
खर्च, अनियमित पाऊस, अवकाळी पावसाचे संकट आणि शेतीमालाच्या अस्थिर बाजारभावामुळे
आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे नवसंजीवनी मिळण्याची
अपेक्षा आहे.
जालना जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने
शेतीवर आधारित आहे. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मका, तूर, ज्वारी आदी प्रमुख
पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलत्या
हवामानाचा सर्वाधिक फटका या पिकांना बसत आहे. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी व
अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट होत आहे. त्यातच बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि
सिंचनाचा वाढलेला खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. परिणामी अनेक
शेतकरी पीककर्जाची नियमित परतफेड करू शकले नाहीत.
याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर
केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही आर्थिक
संकटातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाची संधी मानली जात आहे. या योजनेअंतर्गत
शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांच्या पीककर्जाची माफी अथवा
कर्जातून दिलासा देण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत कर्जाचा बोजा कमी होऊन
शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी पुन्हा बँकांकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार
आहे.
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभाची अपेक्षा
जालना जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून
पीककर्ज घेतात. गेल्या काही वर्षांत प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकांची कर्जे थकीत
झाली आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमुक्तीच्या
कक्षेत येणार आहे. त्यामुळे शेतीतील गुंतवणूक वाढण्याबरोबरच ग्रामीण अर्थ
व्यवस्थेलाही चालना मिळू शकेल.
कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे आवाहन
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक खाते,
पीककर्जाची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, असे आवाहन करण्यात
आले आहे. पात्र लाभार्थ्यांची पडताळणी बँका, सहकारी संस्था आणि महसूल विभागाच्या
नोंदींच्या आधारे केली जाणार असल्याने नोंदी अचूक असणे आवश्यक ठरणार आहे.
बँका आणि कृषी विभागाकडे वाढली चौकशी
योजनेची घोषणा झाल्यानंतर जालना
जिल्ह्यातील कृषी विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध राष्ट्रीयकृत
बँकांच्या शाखांमध्ये शेतकऱ्यांची चौकशी वाढली आहे. अनेक शेतकरी पात्रतेचे निकष,
लाभाची मर्यादा आणि अर्ज प्रक्रियेबाबत माहिती घेत आहेत. शासनाकडून अधिकृत
मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग येणार आहे.
अफवांपासून दूर
राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
दरम्यान, योजनेबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारची माहिती प्रसारित होत
असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे
प्रशासनाने स्पष्ट केले आहे. योजनेची पात्रता, लाभ, अर्ज प्रक्रिया आणि इतर
बाबींबाबतची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत आदेश, संबंधित बँका, कृषी विभाग किंवा
जिल्हा प्रशासनाकडूनच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
मराठवाड्यातील शेती
सातत्याने नैसर्गिक संकटांना सामोरे जात असताना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' ही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
ठरू शकते. प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी झाल्यास ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती
मर्यादित न राहता शेतकऱ्यांना नव्याने उभारी देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला
बळकटी देणारी ठरेल.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment