Thursday, 9 July 2026

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत विकासकामांच्या प्रगती आढावा बैठक संपन्न

 




 

जालना,दि.9(जिमाका): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2026-27 मधील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठक पार पडली.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारीया, मनपा आयुक्त अंजली शर्मा जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल यांनी राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. सन 2025-26 आणि त्यापूर्वीच्या वर्षांतील विभागनिहाय मंजूर निधी, त्यातील खर्च, तसेच सन 2023-24 व त्यानंतरच्या वर्षांतील खर्च न झालेल्या निधीबाबत कारणांसह सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी सन 2025-26 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या मात्र प्रत्यक्षात काम सुरू न झालेल्या सर्व योजनांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. अशा कामांची सद्यस्थिती, काम सुरू होण्यास झालेला विलंब आणि ती कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीत पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनांनुसार कोणकोणती कार्यवाही करण्यात आली आहे, याचा आढावा ही  बैठकीत सादर घेण्यात आला. प्रत्येक विभागाने शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी दिले.

सन 2026-27 च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा विकास आराखडा, गतिमान प्रशासन, व्यक्तिमत्त्व विकास, जिल्हा विकास आराखडा (महसूल व भांडवली) तसेच शाश्वत विकास ध्येय (SDG) अंतर्गत प्रस्तावित योजनांवरही सविस्तर चर्चा झाली. या योजनांचे प्रस्ताव वेळेत सादर करून विकासकामांना गती देण्याचे आवाहन करण्यात आले.

याशिवाय जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत सन 2026-27 मध्ये हाती घेण्यात येणाऱ्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सन 2025-26 मध्ये झालेल्या निधी खर्चाचा आढावा घेऊन खर्चाची गती वाढविण्यावर भर देण्यात आला. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी मित्तल यांनी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वयाने काम करत शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार विकासकामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच उपलब्ध निधीचा शंभर टक्के विनियोग सुनिश्चित करावा आणि प्रलंबित प्रस्ताव व अहवाल विहित मुदतीत सादर करावेत, असे निर्देश दिले.

यावेळी बैठकीत विविध विभागांच्या योजनांची अंमलबजावणी, निधी खर्च, प्रलंबित कामे तसेच आगामी वर्षातील विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, नियोजन विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment