रायगड येथे निवासी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पोलीस पाटील व कोतवालांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपदा मित्र किट व प्रमाणपत्रांचे वितरण
जालना,दि.27(जिमाका) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांच्या वतीने रायगड येथे आयोजित
12 दिवसांचे निवासी 'आपदा मित्र' प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून आलेल्या 68
पोलीस पाटील व कोतवालांना आज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण आशिमा मित्तल यांच्या हस्ते आपदा मित्र किट तसेच प्रशिक्षण पूर्ण
केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन
करताना सांगितले की, गावपातळीवर सक्षम व प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी निर्माण
करून आपत्ती व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने
प्रयत्नशील आहे. आपत्तीच्या प्रसंगी गावपातळीवर सर्वप्रथम मदतीसाठी धावून जाणारे
पोलीस पाटील व कोतवाल हे प्रशासनाचे महत्त्वाचे दुवे असून, रायगड येथे प्राप्त
केलेले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, शोध व बचाव कार्य, प्रथमोपचार, पूर, वीज
पडणे, अग्नी दुर्घटना, सर्पदंश तसेच आपत्कालीन परिस्थितीतील समन्वयाचे कौशल्य
प्रत्यक्ष कार्यात वापरून गावातील नागरिकांचे जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी
त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
रायगड येथे आयोजित निवासी प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तात्काळ
प्रतिसाद, शोध व बचाव कार्य, प्रथमोपचार, दोरीच्या साहाय्याने बचाव तंत्र, जलबचाव,
अग्निसुरक्षा, समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध आपत्तीजन्य
परिस्थितींचा प्रत्यक्ष सराव देण्यात आला.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या 68 पोलीस पाटील व कोतवालांना
गावपातळीवर प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साहित्य असलेले आपदा
मित्र किट तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आले.
यावेळी जालना शहर महानगरपालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे, जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर, सतीश उढाण, ज्ञानेश्वर राऊत, छत्रसिंग कायते,
राहुल बिजुले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेले पोलीस पाटील व कोतवाल उपस्थित होते.
-*-*-*-*-*-*-*-


No comments:
Post a Comment