Wednesday, 22 July 2026

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


 

     जालना दि. 22 (जिमाका) :-    जिल्ह्यात दि. 25 जुलै, 2026 रोजी देवशयनी आषाढी एकादशी, दि. 29 जुलै,2026 रोजी गुरुपौर्णिमा, दि. 1 ऑगस्ट,2026 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयेंती इत्यादी जयंती, सण, उत्सव साजरे होणार आहेत. तसेच राज्यातून विविध ठिकाणावरुन यात्रेसाठी पायी दिंड्या जालना जिल्ह्यातुन मार्गक्रमण करत आहेत. सण, उत्सव, जयंती यांनिमित्त जिल्ह्यात शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठृया प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

तसेच सध्या महाराष्ट्रात व देशभरता आरक्षण उपवर्गीकरणाला तिव्र विरोध होत आहे. तसेच सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण  व धनगर आरक्षण मिळावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच  शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 23 जुलै, 2026   रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 5 ऑगस्ट,2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत कलम 37 (1) व  (3)  अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शशीकांत हदगल  यांनी जारी केले आहे.

 

        पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

तर पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.   हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 23 जुलै, 2026   रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 5 ऑगस्ट,2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment