Wednesday, 15 July 2026

अमृतची लाभदायी योजना व्यवसाय कर्जावरील व्याज परतावा

 


 

जालना, दि.15 (जिमाका):   महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येणारी वैयक्तिक व्याज परतावा योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी प्रभावी आर्थिक आधार देत आहे.या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना मिळतो, ज्यांना शासनाच्या कोणत्याही स्वतंत्र विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही.

स्वतःचा उद्योग, व्यवसाय किंवा सेवा उपक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल उभारणीसाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत कमाल 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर जास्तीत जास्त 12 टक्के दराने दोन वर्षांचा व्याज परतावा दिला जातो. या योजनेमुळे उद्योजकांचा आर्थिक भार कमी होऊन स्वयंरोजगाराला चालना मिळत असून, नवउद्योजकांना व्यवसाय अधिक सक्षमपणे उभारण्याची संधी उपलब्ध होत आहे.

आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड,  पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) / शाळा निर्गम प्रमाणपत्र / जातीचा सक्षम कागदोपत्री पुरावा, वार्षिक उत्पन्नाचा दाखला (रु. 8 लाखांपेक्षा कमी) , अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)संपर्क: अमृत जिल्हा कार्यालय,  दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना  मो.7391065474 जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केले आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment