जालना, दि.17 (जिमाका): राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026
मध्ये महत्त्वाचे बदल करत हजारो शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 15 जुलै 2026 रोजी
सहकार विभागाने शासन निर्णय जारी करून कर्जमाफीच्या पात्रतेचे निकष अधिक सुलभ केले
आहेत.
यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजना-2019 चा लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आले होते.
आता सरकारने हा निर्णय बदलत अशा शेतकऱ्यांनाही नव्या योजनेचा लाभ देण्याचा मार्ग
मोकळा केला आहे.
नवीन निर्णयानुसार, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या
कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीककर्ज किंवा पुनर्गठित (रीशेड्युल/रिफायनान्स) कर्ज, 30
सप्टेंबर 2025 रोजी थकीत असेल आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली
नसेल, तर अशा कर्जदारांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.
सरकारने योजनेतील एकरकमी समझोता (OTS) संबंधीचे काही
निर्बंधही हटवले असून प्रोत्साहनपर लाभासाठी असलेली 2026-27 या आर्थिक वर्षाची
अटही रद्द करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळाच्या
पावसाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेनंतर मंत्रिमंडळाने हा निर्णय मंजूर केला होता.
त्यानुसार शासनाने सुधारित आदेश काढला आहे.
या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्ती, आर्थिक
संकट आणि सततच्या शेतीतील अडचणींमुळे कर्जबाजारी झालेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा
दिलासा मिळणार आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment