Thursday, 23 July 2026

जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ ‘समाधान शिबिराचे’ आयोजन

 


जालना, दि.23 (जिमाका) : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत राज्यभर 22 जुलै ते 2 ऑगस्ट, 2026 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘समाधान शिबिर’ आयोजित करण्यात निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीचे औचित्य साधुन या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जालना जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांची संबंधित विधानसभा मतदारसंघासाठी मुख्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शिबिरांचे प्रभावी नियोजन, समन्वय व यशस्वी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या शिबिरांमध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा, योजना व नागरिकांना आवश्यक असलेले विविध दाखले, प्रमाणपत्रे व लाभएकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचे तात्काळ निराकरण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व हक्क सनद, निवासी अतिक्रमण नियमितीकरण, जिवंत 7/12 मोहीम, ई-फेरफार प्रकरणे, फार्मर आयडी, विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ, आयुष्यमान भारत कार्ड, आधार सेवा, शिधापत्रिका, मतदार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, मनरेगा, कामगार नोंदणी आदी विविध सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.

तसेच जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जलकवच अभियान "जलतारा", पोटहिस्सा मोजणी अभियान, शेतरस्ते अभियान, 100 वर्षांवरील नागरिकांचे आधार प्रमाणीकरण, प्रलंबित महसुली प्रकरणे निकाली काढणे तसेच स्थानिक गरजेनुसार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जालना जिल्ह्यातील समाधान शिबिरांचे वेळापत्रक

जालना विधानसभा मतदारसंघ : 26 जुलै, 2026 रोजी सकाळी 10 वाजता मुक्तेश्वर लॉन्स (मनपा), जालना येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांची मुख्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघ : 31 जुलै, 2026 रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मागील मैदान, बदनापूर येथे शिबिर होणार असून, तहसीलदार एस. एच. हंडेश्वर यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ : 1 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 10 वाजता नृसिंह मंगल कार्यालय, घनसावंगी येथे शिबिर होणार असून, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी हे नोडल अधिकारी राहतील.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी संबंधित विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा व सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment