Thursday, 23 July 2026

विशेष वृत्त: प्रशासकीय सेवा आता थेट तुमच्या दारी; 'जालना मित्र' ठरतोय सुशासनाचा नवा आदर्श !

 


जालना, दि.23 (जिमाका) :  सरकारी कार्यालयातील खेटे आणि लांब रांगांतून नागरिकांची कायमची मुक्तता करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून 'जालना मित्र' (Jalna Mitra) हे नाविन्यपूर्ण घरपोच शासकीय सेवा पोर्टल नुकतेच सुरू केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारा हा उपक्रम खऱ्या अथर्थाने 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना साकारत आहे.

घरपोच सेवेची सुलभ प्रक्रिया आता नागरिकांना कार्यालयात जाण्याची गरज नाही. ते मोबाईलवरून www.jalnamitra.in या पोर्टलवर जाऊन ग्रामस्तरीय उद्योजकाची (VLE) अपॉइंटमेंट बूक करू शकतात. यानंतर नियुक्त VLE थेट अर्जदाराच्या घरी येऊन कागदपत्रे घेतात. शासकीय शुल्का व्यतिरिक्त केवळ १०० रुपये घरपोच सेवा शुल्क आकारून अर्ज ऑनलाइन भरतात. अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीनंतर प्रमाणपत्र पुन्हा घरीच आणून दिले जाते. या सुविधेमुळे विशेषतः दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील जनतेचा वेळ, श्रम व पैसा वाचत आहे.

आकडेवारीतून प्रशासनाची गती सध्या या पोर्टलद्वारे महसूल, पोलीस, कृषी आदी १३ विभागांच्या रेशन कार्ड, रहिवासी प्रमापणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, डिजिटल जीवन प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र यांसारख्या २० जीवन आवश्यक सेवा घरपोच दिल्या जात आहेत. संपूर्ण जिल्ह्यात 200 VLE अहोरात्र कार्यरत आहेत. अल्पावधीतच प्राप्त 2,215 अर्जापैकी 1,898 सेवा यशस्वीरित्या वितरित झाल्या आहेत.

यासोबतच नागरिकांना माहिती व मार्गदर्शन मिळवण्यासाठी ७३८९७९३८७७४ या क्रमांकावर २४x७ व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. "हा उपक्रम प्रशासन रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. नागरिकांचा अमूल्य वेळ व पैसा वाचावा आणि त्यांना सन्मानाने सेवा मिळाव्यात, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.'

पारदर्शकता, वेग आणि तंत्रज्ञानाची सुरेख सांगड घालणारे हे 'जालना मॉडेल' संपूर्ण महाराष्ट्रासाठी निश्चितच दिशादर्शक ठरत आहे. सर्व नागरिकांनी आपले अर्ज ‘जालना मित्र’ या पोर्टलवरून सादर करुन, घरपोच सेवेचा लाभ घ्यावा असे नागरिकांना उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे यांनी आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment