Thursday, 23 July 2026

महात्मा जोतीराव फुले द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागात विविध उपक्रमांचे आयोजन पशुपालकांसाठी जंतनाशक, वंध्यत्व निवारण शिबिरे व तांत्रिक मार्गदर्शन चर्चासत्रांचे वेळापत्रक जाहीर

 


 

जालना, दि.23 (जिमाका) : महान समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीला 2027 मध्ये 200 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार वर्ष 2027 हे 'महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष' म्हणून साजरी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभरात विविध शेतकरी-हितोपयोगी उपक्रम राबवले जाणार असून, याबाबतचे सविस्तर वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागातर्फे या उपक्रमातंर्गत जुलै 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत प्रत्येक गावात जंतनाशक शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. जुलै 2026 ते फेब्रुवारी 2027 दरम्यान गायी व म्हशींमधील वंध्यत्व निवारणासाठी विशेष तपासणी व उपचार शिबिरे घेतली जातील. मार्च 2027 ते एप्रिल 2027 या काळात पशुसंवर्धनविषयक आधुनिक तांत्रिक माहिती व मार्गदर्शनासाठी चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल.

उपक्रमांचे वैशिष्ट्ये व महत्व :

·       जंतनिर्मूलन मोहीम : जनावरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे वजन घटणे, भूक मंदावणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे व विविध आजारांमुळे पशुधन मृत्युमुखी पडण्याचा धोका असतो. यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांतील औषधांचा वापर करून प्रत्येक गावात जंतनाशक शिबिरांद्वारे नियमित जंतनिर्मूलन केले जाणार आहे.

·       वंध्यत्व निवारण शिबिरे : दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी जनावरांचे नियमित वेत होणे आवश्यक असते. जनावरांमध्ये वंध्यत्व आल्यास प्रतिवर्षी वेत न मिळाल्याने संगोपनाचा खर्च वाढून पशुपालक तोट्यात जातात. यावर उपाय म्हणून प्रत्येक गावात शिबिरांचे आयोजन करून गायी व म्हशींची वंध्यत्व तपासणी व उपचार केले जातील.

·       तांत्रिक चर्चासत्रे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन : पशुपालकांना आधुनिक पशुसंवर्धनाची माहिती मिळावी यासाठी कृषी       विज्ञान केंद्र आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना निमंत्रित करून प्रत्येक गावात तांत्रिक चर्चासत्रे     आयोजित केली जातील.

पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पुरवण्यात आलेल्या औषधांमधून हे उपक्रम राबवले जाणार असून, सर्व प्रादेशिक कार्यालयांना या उपक्रमांचा मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत. या उपक्रमांमुळे राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून पशुधनाची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.   

       महान समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभरात विशेष उपक्रम राबवले जात आहेत. ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे, जनावरांचे आरोग्य सुधारणे व दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जंतनिर्मूलन, वंध्यत्व निवारण व तांत्रिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गावातील पशुधनापर्यंत पोहोचण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. राज्यातील सर्व पशुपालकांनी या शिबिरांचा व उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन  पशुसंवर्धन आयुक्त,डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

·       पशुवैद्यकीय सेवांसाठी कॉल करा 1962,  व्हॉट्सअप चॅटबॉट सेवेसाठी 9063142299

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment