जालना दि.7,(जिमाका): इस्रायलमध्ये
होम बेस्ड केअरगिव्हर (Home Based Caregiver) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती
जाहीर करण्यात आली आहे. एकूण 3 हजार 500 पदांसाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. इस्रायलमध्ये प्रशिक्षित केअरगिव्हरची वाढती मागणी लक्षात घेता
ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनासह
विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या
पदासाठी 25 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक
आहे. उमेदवाराला इंग्रजी भाषेचे मध्यम स्तराचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच पासपोर्ट
किमान 3 वर्षांसाठी वैध असावा आणि उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक
आहे. महिला उमेदवारांना 90 टक्के व पुरुष उमेदवारांना 10 टक्के प्रमाणात संधी देण्यात
येणार आहे. उमेदवाराने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे तसेच त्यांचे निकटवर्तीय
कुटुंबीय सध्या इस्रायलमध्ये वास्तव्यास नसावेत.
अनुभव
व प्रशिक्षणाच्या बाबतीत, उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवांमध्ये किमान 990 तासांचे प्रशिक्षण
(OJT सहित) पूर्ण केलेले असावे किंवा GDA / ANM / GNM / BSc Nursing / Post BSc
Nursing यापैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना निवासी
स्वरूपात काम करावे लागेल, ज्यामध्ये वृद्ध व दिव्यांग व्यक्तींची दैनंदिन देखभाल,
औषधे देणे, हालचालीस मदत करणे तसेच आवश्यकतेनुसार बाहेर नेणे अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या
लागतील. निवड प्रक्रिया ऑनलाइन मुलाखत व व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पार पडणार
असून अंतिम निवड इस्रायली नियोक्त्याकडून करण्यात येईल व निवड झालेल्या उमेदवारांना
मासिक अंदाजे रु. 2,00,000/- इतके वेतन देण्यात येईल.
जालना जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सुवर्णसंधीचा
लाभ घेऊन परदेशात रोजगार मिळविण्यासाठी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या
लिंकवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी किंवा सहाय्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे प्रत्यक्ष
संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक 02482-299033 वर संपर्क करावा. तसेच jalnarojgar@gmail.com
या ई-मेलवरही संपर्क साधता येईल. असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,
जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment