Friday, 8 May 2026

विकसित जालना घडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे -विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

 




जालना,दि.8(जिमाका) :  जिल्ह्यातील विकासकामे अधिक गतीने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून काम करावे. तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्न स्थानिक स्तरावरच सोडविण्याचा प्रयत्न करावा. ‘विकसित जालना’ या संकल्पनेच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचा स्वतंत्र व्हिजन मॅप तयार करून दीर्घकालीन नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कांवरिया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक संधू, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विभागीय आयुक्त पुढे म्हणाले की, आपले मुख्यमंत्री यांच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि विकसित भारत या संकल्पनेला अनुसरून जिल्ह्यातील सर्व विभागांनी उद्दिष्टपूर्तीसाठी काम करावे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार आगामी काळात मराठवाडा भागावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार कृषी, पशुसंवर्धन आणि पाणीपुरवठा विभागांनी आतापासूनच आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला असून, जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेऊन, ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी महसूल आणि पोलिस विभागाने समन्वयाने काम करावे व आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घ्यावी, असे सांगितले.

महानगरपालिका आणि नगरपालिका प्रशासनाने शहर परिसरातील स्वच्छतेवर विशेष भर देत नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. याशिवाय जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लखपती दीदी अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महिलांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच स्वयंरोजगार, बचत गट आणि कौशल्यविकास योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात यावा.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस विभागाने प्रभावी नियोजन करावे. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून, आवश्यकतेनुसार त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रशासनाने चांगल्या नागरिकांचे संरक्षण आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका ठेवून काम करावे.

प्रत्येक विभागाने त्यांच्या राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांची स्वतंत्र माहिती तयार ठेवावी. शासनाकडून विचारणा झाल्यास संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी विभागाने कोणते प्रयत्न केले याचा पुढील काळात सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाकडून जिल्ह्याच्या विकासाकरीता कोणत्याही विषयावर प्रस्ताव मागविण्यात आल्यास तो प्रस्ताव तत्काळ सादर करता येईल, या दृष्टीकोनातून सर्व विभागांनी पूर्वतयारी ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हा प्रशासनाने विविध स्तरांवर आवश्यक असलेल्या मनुष्यबळ, निधी आणि इतर संसाधनांची माहिती अद्ययावत ठेवण्यावर भर द्यावा. यासोबतच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची स्वगणना पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभागांनी एकत्रितपणे काम करून विकसित जालनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वयाने काम करावे असे ही जी. श्रीकांत यांनी यावेळी सांगितले

प्रारंभी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध विभागाची माहिती सादर केली. यावेळी विविध विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment