जालना,दि.7(जिमाका) : पनीरच्या नावाखाली स्वस्त दरातील
‘चीज ॲनालॉग’ विक्री करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स
तसेच फास्ट फूड विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून नियमांचे उल्लंघन
करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे
आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा
सुरक्षित अन्न व पोषक आहार समितीच्या अध्यक्षा आशिमा मित्तल यांनी संबंधित
मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, फास्ट फूड
विक्रेते तसेच पनीर व चीज ॲनालॉग उत्पादकांची व्यापक तपासणी करण्याच्या सूचना
त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
पनीर आणि चीज ॲनालॉगमधील फरक
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या
माहितीनुसार, “पनीर” हा पदार्थ पूर्णपणे दुधापासून तयार
केला जातो. तर “चीज
ॲनालॉग”
तयार करताना दुधासोबत किंवा त्याऐवजी खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर व इतर घटकांचा
वापर केला जातो.
ग्राहकांनी घ्यावी ही काळजी
अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांना
खरेदी करताना काही बाबींची विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पॅकबंद पनीर
खरेदी करताना त्यावरील लेबल तपासावे. सुटे पनीर घेताना ते शुद्ध दुधाचे असल्याची
खात्री करून संशय आल्यास बिल घ्यावे. तसेच हॉटेलमध्ये पदार्थ ऑर्डर करण्यापूर्वी
मेन्यूकार्डवर ‘पनीर’ आणि ‘ॲनालॉग’ असे स्वतंत्र पर्याय नमूद आहेत का, हे तपासावे.
हॉटेल व्यावसायिकांसाठी सूचना
अन्न व औषध प्रशासनाकडे अनेक हॉटेल
व्यावसायिक ग्राहकांना कोणतीही माहिती न देता स्वस्त दरातील चीज किंवा पनीर ॲनालॉग
वापरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता ज्या हॉटेल किंवा
रेस्टॉरंटमध्ये चीज ॲनालॉगचा वापर केला जातो, त्यांनी मेन्यूकार्ड अथवा डिस्प्ले
बोर्डवर त्याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय हॉटेल चालकांनी
पनीर ॲनालॉग किंवा चीज ॲनालॉग खरेदी करताना बिलावर संबंधित पदार्थाचा स्पष्ट
उल्लेख असल्याची खात्री करूनच खरेदी करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
शाकाहारींसाठी पनीर हा प्रथिनांचा
महत्त्वाचा स्रोत मानला जातो. मात्र काही व्यावसायिक आर्थिक फायद्यासाठी कमी
दर्जाच्या घटकांचा वापर करून पनीरसदृश पदार्थ विकत आहेत. यावर प्रतिबंध
घालण्यासाठी आणि नागरिकांना सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी
जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन
करणाऱ्या आस्थापना विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment