Friday, 1 May 2026

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता-पालकमंत्री पंकजा मुंडे • ‘रायझिंग जालना 2026’ला नागरिकांचा उस्फूर्त प्रसिसाद

 





जालना दि.1 (जिमाका) : जालना जिल्ह्याचा इतिहास समृध्द असुन, विकसनशील जिल्हा म्हणुन आपल्या जिल्ह्याची ओळख आहे. स्टिल-सिल्क-सिड्स या क्षेत्रातील विकासामुळे जालना जिल्ह्याचे नाव जगभर प्रसिध्द आहे. आशाचप्रकारे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रिक काम करण्याची आवश्यकता असल्याचे  प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

येथील अग्रेसन भवन येथे जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘रायझिंग जालना 2026’ कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी श्रीमती मुंडे या बोलत होत्या. यावेळी  महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे,  आमदार राजेश राठोड, अर्जून खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज ‘रायझिंग जालना 2026’ या उपक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्रीत आलो आहोत, ही अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. जालना जिल्हा हा केवळ मराठवाड्याचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत आहे. यासाठी आपण सर्वांनी केलेल्या प्रयत्नामुळेच हा विकास झालेला आहे. माझ्यासाठी, पालकमंत्री म्हणून, हा केवळ एक प्रकल्प नाही. तर जालन्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा एक ठोस संकल्प आहे. आज आपण ‘रायझिंग जालना 2026’ द्वारे उद्योग, शेती, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्वत:ची ओळख विसरुन जो काम करतो, तोच विकासाची कामे करु शकतो. कोणत्याही विकासाचा जन्म हा, अस्तित्वात नसलेल्या गोष्टीपासुनच होत असतो.  

आपल्या जिल्ह्याची ओळख ही स्टील उद्योग, बियाणे उद्योग आणि प्रगतिशील शेतीमुळे आहे. आता वेळ आली आहे की, आपण या ओळखीला नव्या उंचीवर घेऊन जाऊया. नवीन गुंतवणूक आकर्षित करून, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विकासाला गती देऊ. राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपण जालना जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, औद्योगिक वसाहती आणि डिजिटल सुविधा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करत आहोत. ‘Ease of Doing Business’ साठी जालना हा एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी आपण एकत्रित येऊन काम करुया, असेही पालकमंत्री श्रीमती मुंडे यावेळी म्हणाल्या.

यावेळी आमदार श्री. खोतकर म्हणाले की, कोणत्याही जिल्ह्याचा विकास हे शासन आणि प्रशासन यांच्या समन्वयानेच होत असतो. आपला जालना जिल्हा विविध क्षेत्रात भरारी घेत असुन, ड्रायपोर्ट, लॉजीस्टीक, रेल्वेचे दुहेरीकरण, रेल्वेचे विद्युतीकरण, वैद्यकीय महाविद्यालय आदी विकास कामाच्या माध्यमातून बदलताना आपणांस दिसत आहे. आपण शहरासाठी पाणीपुरवठा योजना, सौर प्रकल्प, कुंड निर्मिती आदी विकास कामे केलीत. जालना करीता 120 कोटी रुपयाचे विपश्यना केंद्र मंजूर करुन घेतल्याचेही त्यांनी सांगितले.  

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल प्रास्ताविकात म्हणाल्या की, जालना जिल्ह्याच्या स्थापनेला 45 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘रायझिंग जालना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगती, नवोन्मेष, एकता आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल दर्शविणारा हा कार्यक्रम जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेणारा आणि भविष्यातील दिशा ठरविणारा ठरणार असल्याचे सांगितले. तसेच जालना जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विविध विकास प्रकल्प, तसेच आगामी योजनांचे सादरीकरणाद्वारे त्यांनी माहिती सादर केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी परतुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. 

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विविध स्टॉलला भेटी देवून माहिती जाणुन घेतली. तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘रायझिंग जालना’ लोगो, ‘ताईचा कट्टा’, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ आणि ‘जालना सुपर 50 शेतकरी’ या उपक्रामाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच तिरंदाज तेजल साळवे, प्रतिष्ठित उद्योजक सुनिल रायठ्ठा, रोटरी क्ल्बचे सदस्य, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना सिड्स बॉल  वितरीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांची, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment