Monday, 18 May 2026

*जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता;*

  • *नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी - जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

जालना,दि.18(जिमाका) : भारत हवामान विभागाने दिनांक 18 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार मराठवाडा विभागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून] जालना जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत वाढत्या तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण तसेच उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असून विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार तसेच मैदानी भागात काम करणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. नागरिकांनी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या कालावधीत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी पिणे, ओआरएस, ताक, लिंबूपाणी, घरगुती पेये यांचे सेवन करणे, हलके व सुती कपडे वापरणे तसेच डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. उष्णतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा, उलटी, ताप, जास्त घाम येणे किंवा बेशुद्धावस्था जाणवल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना उष्माघात बाधित रुग्णांवर तातडीने उपचारासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आवश्यक औषधसाठा, ओआरएस, पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत आरोग्य विभागास निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ग्रामपंचायत, नगर परिषद व नगरपालिका स्तरावर सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाणपोई व सावलीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. शाळा, अंगणवाडी, बांधकाम स्थळे तसेच मनरेगा कामांमध्ये दुपारच्या वेळेत आवश्यक ती काळजी घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

शेतकरी बांधवांनी सकाळी अथवा सायंकाळी पिकांना हलके सिंचन करावे. भाजीपाला व फळबागांमध्ये मल्चिंग, शेडनेट आदी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पुरेसे पिण्याचे पाणी व सावली उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासन व हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.


****


No comments:

Post a Comment