Friday, 15 May 2026

जनगणना 2027 अंतर्गत घरसूचीकरण व घरगणना मोहिमेची आजपासून सुरुवात

 


 

जालना,दि.15(जिमाका) : भारत सरकारच्या निर्देशानुसार देशातील 16 वी जनगणना प्रक्रिया जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत दोन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, त्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या घरसूचीकरण आणि गृहगणना (House Listing Operations-HLO) मोहिमेला जिल्ह्यात 16 मे, 2026 म्हणजे आजपासून सुरुवात होत आहे. ही प्रक्रिया 14 जून, 2026 पर्यंत चालणार असून, यासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक घराघरांत जाऊन माहिती संकलन करणार आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून या मोहिमेसंदर्भातील सर्व आवश्यक सूचना व माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार प्रक्रिया

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 15 मे 2026 रोजी सर्व प्रगणक (Enumerators) व पर्यवेक्षकांना ट्रेनिंग अॅप काढून अधिकृत HLO अॅप डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  16 मे पासून प्रत्यक्ष मॅपिंगच्या कामास सुरुवात होणार असून, प्रगणक आपल्या नियुक्त HLB क्षेत्राची पाहणी करून कच्चे नकाशे तयार करतील. त्यानंतर 16 ते 18 मे दरम्यान प्रगणक, पर्यवेक्षक आणि चार्ज ऑफिसर यांच्या समन्वयाने सीमांकन व इमारतींचे रेखांकन पूर्ण केले जाणार आहे. 19 ते 20 मे या कालावधीत प्रत्येक घरावर ‘सी.एच. नंबर’ टाकण्याचे काम करण्यात येणार असून, ही प्रक्रिया उत्तर-पश्चिम दिशेकडून दक्षिण-पूर्व दिशेकडे केली जाणार आहे. यानंतर 21 मे ते 5 जून, 2026 या मुख्य कालावधीत प्रगणक मोबाईल अॅपच्या सहाय्याने घराघरांत जाऊन 1 ते 33 प्रश्नांद्वारे माहिती संकलित करणार आहेत. 6 ते 14 जून, 2026 या अंतिम टप्प्यात फायनल सिंक व तपासणी प्रक्रिया पार पडणार असून, वरिष्ठ अधिकारी रॅन्डम  (Random) पद्धतीने प्रत्यक्ष पाहणी करून माहितीची पडताळणी करणार आहेत.

मोहिमेची वैशिष्ट्ये

घरगणना मोहिमेत डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. प्रगणकांकडून दर 5 ते 10 नोंदीनंतर डेटा सिंक केला जाणार आहे. तसेच इमारतींचे क्रमांक आणि सीएच नंबर यामध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याने माहिती नोंदविताना विशेष दक्षता घेतली जाणार आहे.  प्रत्येक इमारतीवर व घराबाहेर प्रत्यक्ष क्रमांक लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, स्वतः ऑनलाईन पद्धतीने जनगणना करणाऱ्या कुटुंबांना ‘SE ID’ प्राप्त करून घ्यावा लागणार असून, घरभेटी दरम्यान प्रगणकांकडून त्याची पडताळणी केली जाणार आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जनगणना 2027 हे देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून, सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असेही प्रशासनाने आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment