मिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हास्तरीय
प्रशिक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
जालना,दि.25(जिमाका): मिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हा
स्त्री रुग्णालय, जालना येथे दि. 25 मे ते 7 जून, 2026 या कालावधीत आयोजित
जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 25 मे रोजी जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
यांनी “कुपोषणमुक्त
जालना” हे
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच सर्व
संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील कुपोषणाचे
प्रमाण कमी करून बालकांचे आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग व महिला
व बाल विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या आणि
अंगणवाडी सेविका यांना पोषण आहार, संतुलित आहार, माता व बालकांच्या आरोग्याची
काळजी तसेच कुपोषण प्रतिबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी
आयआयटी मुंबई यांच्या माध्यमातून पोषण आहारासंदर्भातील शैक्षणिक व्हिडिओचा उपयोग
करण्यात येत असून व्हील ग्लोबल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने प्रशिक्षण प्रक्रिया
राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत सुमारे 250
प्रशिक्षणार्थींना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणानंतर प्रत्येक
प्रशिक्षणार्थीने 1:3 या प्रमाणात मातां व बालकांना दत्तक घेऊन त्यांचे समुपदेशन
करायचे आहे. यामध्ये पोषण आहाराचे महत्त्व, संतुलित आहार, बालकांच्या वाढीचे
निरीक्षण आणि कुपोषण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. तीन
महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2 हजार 250 माता व बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ
पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील
कुपोषण निर्मूलनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त
करण्यात आला.
या कार्यक्रमास जिपचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, डॉ. प्राची तापशेटीवार, डॉ. जी. डी. म्हस्के,
महिला व बाल विकास विभागाच्या श्रीमती कोरे, जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप गुसाळे,
साक्षी उगले तसेच आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातील अधिकारी व
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****

No comments:
Post a Comment