जालना,दि.19(जिमाका): जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजाला गती
देण्यासाठी तसेच विविध प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्याच्या दृष्टीने आज
तहसील कार्यालय, भोकरदन व उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोकरदन येथे जिल्हाधिकारी
आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली. बैठकीत महसूल,
निवडणूक, गृहनिर्माण व ग्रामविकासाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा
घेण्यात आला.
यावेळी भोकरदन तालुक्यात सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेचा आढावा घेण्यात
आला. जनगणना काम अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना
देण्यात आल्या. तसेच ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे उपलब्ध
करून देण्याच्या प्रक्रियेबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत विशेष सखोल पुर्नरिक्षण
कार्यक्रम (SIR) अंतर्गत निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. मतदार यादी अद्ययावत
करणे, पात्र मतदारांची नोंदणी व त्रुटी दूर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दक्ष
राहण्याचे निर्देश देण्यात आले.
शासकीय जमिनींवरील अतिक्रमण हटविणे आणि सिलींग जमिनींसंदर्भातील
प्रकरणांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. शासकीय जमिनी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी
प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच प्रलंबित सिलींग
प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री
बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगतीही बैठकीत
तपासण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सुलभ दळणवळणासाठी पाणंद रस्त्यांची
कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच उपविभगीय
अधिकारी कार्यालय भोकरदन येथे भुसंपादन संबंधीत कामकाजाचा एकत्रीत आढावा घेऊन
संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना सदर कामे वेळेत पुर्ण करणे बाबत निर्देश दिले.
बैठकीदरम्यान विविध विभागांच्या प्रलंबित कामकाजाचा आढावा घेत
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना
दिल्या. प्रशासनातील समन्वय वाढवून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे
आवाहनही त्यांनी केले.
यावेळी
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शासकीय धान्य गोदामास प्रत्यक्ष भेट देवून येथील
धान्याच्या गुणवत्तेची पाहणी केली.
यावेळी बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी.बी. सरवनन
(भा.प्र.से.), भोकरदन तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, जाफ्राबाद तहसीलदार अविनाश लोंढे, गट विकास अधिकारी
भोकरदन ,नायब तहसिलदार, मुख्याधिकारी,
यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-*-



No comments:
Post a Comment