Thursday, 14 May 2026

जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासन सज्ज घरयादी व घरगणनेच्या क्षेत्रीय कामांना गती; प्रशिक्षण, नियोजन आणि प्रसिद्धीवर भर

 


 

जालना,दि.14(जिमाका) : केंद्र शासनाने जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत देशव्यापी जनगणना-2027 जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (जनगणना विभाग) यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी करून जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यातील घर यादी व घर गणनेच्या क्षेत्रीय कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, स्वगणनेचा कालावधी दि. 1 मे, 2026ते दि. 15 मे, 2026 दरम्यान राहणार असून, प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाज दि. 16 मे, 2026 ते दि. 14 जून, 2026 या कालावधीत पार पाडले जाणार आहे. या प्रक्रिये दरम्यान नागरिकांच्या घरांची, कुटुंबांची तसेच विविध सामाजिक व मूलभूत माहितीची नोंद केली जाणार आहे.

या कामासाठी प्रशासनाने जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती, सामान्य जनतेची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यासंदर्भातील वैधानिक अधिसूचना प्रसिद्ध केल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, घर यादी व घर गणने दरम्यान विचारण्यात येणारे 33 प्रश्न अधिसूचित करण्यात आले आहेत. जनगणनेची प्रक्रिया सुरळीत आणि अचूक पार पडावी यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना फील्ड ट्रेनरमार्फत प्रशिक्षण देण्यात आले असून, प्रशिक्षण साखळीतील अंतिम टप्प्यातील प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय संरचना मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक प्रशासकीय घटकात घर यादी गट तयार करण्याचे कामही पूर्णत्वाकडे आले असुन, यामध्ये  परिपत्रकात पुढील महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. यात

·      आवश्यक प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करून 23 एप्रिल ते 8 मे,2026 दरम्यान त्यांचे प्रशिक्षण आयोजन करणे.

·      सर्व घरयादी गटांना क्षेत्रीय कामांचे वाटप करून 16 मे, 2026 पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे. आणि 14 जून, 2026 पर्यंत क्षेत्रीय काम पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करणे.

·      घरयादी, घरगणना तसेच स्व-गणनेबाबत व्यापक प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे.

·      1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्व-गणनेसंदर्भातील आवश्यक व्यवस्था करणे.

प्रशासनाने क्षेत्रीय कामकाजात डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्यावरही भर दिला असून, सर्व संबंधित विभागांनी वेळेत समन्वय साधून काम केल्यास जनगणना प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जनगणना-2027 ही देशाच्या लोकसंख्येची, सामाजिक रचनेची आणि विकास आराखड्याची महत्त्वपूर्ण आधारभूत माहिती ठरणार असल्याचे जिल्हा प्रशासन, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

****

 

No comments:

Post a Comment