Wednesday, 22 April 2026

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हा कौशल्य विकास विभागाचे आवाहन

 


जालना,दि.22(जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना (मॉडेल करिअर सेंटर) यांच्या वतीने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने अंतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण व उद्योग या मधील दरी कमी करणे, प्रॅक्टिकल कौशल्य विकसित करणे, रोजगार क्षमतेत वाढ करणे ही योजना तरुणांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेचा देशासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.

या योजने अंतर्गत 18 ते 25 वयोगटातील पात्र युवक-युवतींना नामांकित उद्योगांमध्ये 6 ते 9 महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 19 हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अधिकृत अनुभव व सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असुन, ज्यामुळे भविष्यातील नोकरीच्या संधींमध्ये त्यांना फायदा होणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी केले आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जालना येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.


No comments:

Post a Comment