शेती हा कष्टाचा व्यवसाय, त्यातही कोरडवाहू शेती म्हणजे
नशिबाचा खेळ. पण याच कोरडवाहू मातीत जर जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाची पेरणी केली,
तर समृद्धीचे पीक घेता येते, हे जालन्यातील प्रयोगशील महिला शेतकरी मोनिका पांडुरंग शर्मा यांनी सिद्ध करून
दाखवले आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी बीजोत्पादनाचे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात
करून आज एक यशस्वी उद्योजक शेतकरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्रिडर
सीड्सला 30 टक्के, तर फाउंडेशन बियाण्याला 20 टक्के अतिरिक्त दर मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे
उत्पन्न वाढते. तसेच खरीपानंतर रब्बी हंगामात त्या हरभऱ्याच्या बीडीएन 798 आणि विश्वराज
वाणाचे 40 एकरवर बीजोत्पादन घेतात. याप्रमाणे जिद्द आणि तंत्रज्ञानाची जोड देत जालन्याच्या
मोनिका शर्मां यांनी बीजोत्पादनातून सुवर्ण भरारी घेतली आहे.
§
60 एकरवर प्रगत शेतीचे प्रयोग :-
जालना तालुक्यातील खोडेपुरी
येथील मोनिका शर्मा यांची 60 एकर शेती आहे. एकेकाळी केवळ घरगुती उत्पादनासाठी शेती
करणाऱ्या शर्मा यांनी आता महाबीजच्या सहकार्याने बीजोत्पादनाकडे लक्ष केंद्रित
केले आहे. खरीप हंगामात त्यांनी तब्बल 50 एकर क्षेत्रावर सोयाबीनच्या आंबा या
वाणाचे बीजोत्पादन घेतले. योग्य नियोजन आणि परिश्रमामुळे त्यांना 350 क्विंटल
बियाण्यांचे दर्जेदार उत्पन्न मिळाले आहे.
§
स्वतः चालवतात ट्रॅक्टर आणि अवजारे :-
ग्रामीण भागात आजही
महिलांना शेतीतील दुय्यम कामांसाठी ओळखले जाते. मात्र, मोनिका शर्मा यांनी हा समज
मोडीत काढला आहे. त्या स्वतः ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, बीबीएफ पेरणी यंत्र आणि रिपर
यांसारखी सर्व प्रगत यंत्रसामग्री आणि अवजारे लिलया चालवतात. मजुरांच्या टंचाईवर
मात करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी त्यांनी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला
आहे.
§
रासायनिक खतांना गोठ्याची जोड :-
मोनिका शर्मा
यांच्याकडे 50 देशी गाईंचा गोठा आहे. या गाईंच्या शेणखतामुळे त्यांच्या शेतीची
सुपिकता वाढली असून खताचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. शाश्वत शेतीसाठी त्या
हिरवळीचे खत (सनहेम्प), कंपोस्ट आणि आंतरपिकांचा वापर करतात. पिकांवरील कीड
नियंत्रणासाठी त्या आयपीएम पद्धतीचा वापर करून निमार्क, फेरोमोन सापळे आणि पक्षी
थांबे यांसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देतात.
§
बीजोत्पादनाचे शास्त्र आणि आर्थिक गणित :-
बीजोत्पादन हे
सामान्य शेतीपेक्षा कठीण असते. यात महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे कडक
नियम पाळावे लागतात. मोनिका शर्मा सांगतात की, बियाण्यांचा दर्जा राखण्यासाठी
अधिकाऱ्यांच्या निगराणीत टॅगिंग आणि सीलिंगचे काम केले जाते. यामुळे बियाण्याला
विश्वासार्हता मिळते.
§
महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श :-
कोरडवाहू शेतीतील
महिलांचे कष्ट अनेकदा दुर्लक्षित राहतात. मात्र, सुधारित वाण, कृषी विद्यापीठांचे
मार्गदर्शन आणि कष्टाची तयारी असेल, तर महिला शेतीतून आर्थिक क्रांती घडवू शकतात,
हे मोनिका शर्मा यांच्या यशोगाथेवरून स्पष्ट होते. आज त्या परिसरातील अनेक महिला
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
शेतीत
केवळ कष्ट करून चालत नाही, तर त्याला नियोजनाची आणि तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागते.
महाबीज आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे मला बीजोत्पादनात यश मिळाले. महिलांनी
आधुनिक अवजारे चालवायला शिकले, तर शेती अधिक फायदेशीर होऊ शकते. - मोनिका
पांडुरंग शर्मा, प्रयोगशील महिला शेतकरी, जालना
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment