जालना,दि.24(जिमाका) :-
जालना तालुक्यातील मौजे सेवली येथे दिनांक 23 एप्रिल, 2026 रोजी ‘छत्रपती शिवाजी
महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात कृषी
विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच नागरिकांच्या समस्या
ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्यात आला. या समाधान शिबिरास आमदार बबनराव लोणीकर,
उपविभागीय अधिकारी जालना रामदास दौंड, तहसीलदार श्रीमती छाया पवार, तालुका कृषी
अधिकारी व्ही.जे. राठोड, मंडळ कृषी अधिकारी प्रियांका क्षीरसागर, भरत नागरे, उप
कृषी अधिकारी देशमुख यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते. शिबिरात कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात
आले. यामध्ये पीएम किसान योजना अंतर्गत त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांच्या नोंदी
दुरुस्त करून त्यांना लाभ मिळवून देण्यात आला. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
(PMKSY), कृषी यांत्रिकीकरण योजना, माती नमुना तपासणी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा
योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांसारख्या योजनांची माहिती
शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत प्रातिनिधिक
स्वरूपात काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच
सोयाबीन, करडई, मोहरी, उडीद, भुईमूग आदी पिकांच्या माहितीपत्रिकांचे वितरण करून
शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. शिबिरात सेवली महसूल
मंडळातील उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी फळपिके व भाजीपाला पिकांचे नमुने
प्रदर्शित केले. टोमॅटो, भेंडी, मिरची, हळद, फ्लॉवर, दोडका, वांगे यांसह ड्रॅगन
फ्रूट, टरबूज आणि चिया सीड्स यांसारख्या पिकांचे एकूण 25 नमुने स्टॉलवर मांडण्यात
आले होते. या स्टॉलला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकांबाबत सविस्तर माहिती जाणून
घेतली. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा 2) अंतर्गत प्रातिनिधिक
स्वरूपात पूर्वसंमती प्रमाणपत्रांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या
शिबिरास सुमारे 1200 शेतकरी उपस्थित होते. परिसरातील सर्व गावांचे सरपंच, पदाधिकारी
आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या
कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
उत्कृष्ट नियोजन करून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment