Wednesday, 29 April 2026

दिव्यांगांच्या हितासाठी प्रशासनाचे सकारात्मक पाऊल; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची दिव्यांग पुनर्वसन केंद्राला भेट

 




 

जालना,दि.29(जिमाका) : जालना शहरातील गांधी चमन परिसरात सुरू होत असलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज भेट देवून केंद्राच्या पूर्वतयारीची पाहणी केली. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांना सक्षम व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या या केंद्रामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केंद्रातील सुविधा, उपलब्ध होणाऱ्या सेवा तसेच सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दिव्यांगांना दर्जेदार सेवा आणि आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गांधी चमन येथील मध्यवर्ती ठिकाणी सुरू होणाऱ्या या दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी समुपदेशन, प्रशिक्षण, पुनर्वसन आणि विविध मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्रामुळे दिव्यांगांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

येणाऱ्या 1 मे रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला असून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या भेटीमुळे कामकाजाला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाकडून उचलले जात असलेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक बांधिलकी जपणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून या केंद्राकडे पाहिले जात आहे.

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment