जालना,दि.24(जिमाका) :-
जिल्ह्यातील बालिकांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेतील जिल्हा महिला व बालविकास
विभागामार्फत ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या ‘लेक लाडकी’ या योजनेला
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 5 हजार 312 मुलींना या
योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिपच्या महिला बाल विकास अधिकारी श्रीमती कोमल
कोरे यांनी दिली.
‘लेक
लाडकी’ या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, स्त्री-भ्रूणहत्या
रोखणे, बाल विवाह थांबविणे, मुलांच्या शिक्षणास चालना देणे हा आहे. तसेच या योजने
अंतर्गत पात्र कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते.
मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत ही मदत उपलब्ध
करून दिली जाते. या योजने अंतर्गत मूलींना जन्मानंतर 5 हजार रुपये तर इयत्ता पहिली
6 हजार रुपये, इयत्ता 7 वी गेल्यावर 7 हजार रुपये, अकरावी 8 हजार रुपये तसेच
लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकुण
रुपये 1,0100/- लाभ देण्यात येतो. महिला व बाल विकास विभाग जि.प. जालनामार्फत
राबविण्यात येतात. या योजनेमुळे मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत
प्रोत्साहन तथा खात्री देणे व मुलींच्या शिक्षणास हातभार लागण्यास मदत झाली आहे
‘लेक लाडकी’ योजना ही केवळ आर्थिक मदत नसून समाजातील मुलींबाबतचा दृष्टिकोन
बदलण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. या योजनेमुळे मुलगी खऱ्या अर्थाने
कुटूंबामध्ये लाडकी झाल्याचे चित्र दिसुन येत आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment