Thursday, 10 September 2026

प्रारूप मतदार यादीवर दावे-हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

 

मतदारांनी यादी तपासून आवश्यक ते अर्ज दाखल करण्याचे आवाहन

 जालना,दि.10(जिमाका) :  विशेष सखोल पुनरीक्षण-2026 (SIR) अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप यादीच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 असा कालावधी देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने नागरिकांना आपले नाव व मतदार यादीतील तपशील तपासून आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक 6, नावाच्या समावेशाला आक्षेप घेण्यासाठी नमुना क्रमांक 7, तर मतदाराच्या नोंदीतील दुरुस्ती, मतदार ओळखपत्रातील बदल तसेच दिव्यांग चिन्हांकनासाठी नमुना क्रमांक 8 मध्ये अर्ज करता येणार आहे. तसेच मतदारसंघातील अन्य ठिकाणी स्थलांतर झाल्यामुळे पत्त्यात बदल करण्यासाठीही नमुना क्रमांक 8 अंतर्गत अर्जाची सुविधा उपलब्ध आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासंदर्भात खोटी माहिती अथवा खोटे घोषणापत्र साद करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 31 नुसार मतदार यादीच्या तयारी, पुनरीक्षण, दुरुस्ती किंवा नावाचा समावेश-वगळण्यासंदर्भात जाणीवपूर्वक खोटी माहिती अथवा घोषणा करणाऱ्या व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. 

प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलांमध्ये काही त्रुटी असल्यास नागरिकांनी मुदतीपूर्वी संबंधित अर्ज दाखल करावेत. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी आणि SIR-२०२६ संदर्भातील दावे-हरकती दाखल करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

दावे-हरकतींसाठी महत्त्वाचे नमुने :

·      नमुना 6 : मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी.

·      नमुना 7 : मतदार यादीतील नावाच्या समावेशाला आक्षेप/नाव वगळण्यासंदर्भातील अर्जासाठी.

·      नमुना 8 : नोंदीतील दुरुस्ती, मतदार ओळखपत्रातील बदल, दिव्यांग चिन्हांकन तसेच पत्ता बदलासाठी.

 

नागरिकांनी 30 सप्टेंबरपूर्वी आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

 

****

No comments:

Post a Comment