Friday, 4 September 2026

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी जालना जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

 

 

जालना,दि.4(जिमाका): जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून ही प्रक्रिया गतिमान व पारदर्शक करण्यासाठी जालना जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंडळ उपसमितीचे अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा) शिरीष यादव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 95454 51005 असा आहे.

नोडल अधिकारी यांच्यावर कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून प्रक्रिया गतिमान व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भातील प्राप्त तक्रारींची दररोज आढावा बैठक घेऊन संबंधित प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही करणे, तसेच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयांमध्ये आवश्यक समन्वय साधून प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी कार्यवाही करणे, अशीही जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांवर आहे. याशिवाय जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा अद्ययावत अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे, नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यास अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घेणे आणि आवश्यकतेनुसार संबंधित कार्यालयांना निर्देश देणे, तसेच आवश्यकतेनुसार संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रकरणांचा आढावा घेणे, या जबाबदाऱ्यांचाही समावेश असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी आदेशान्वये कळविले आहे.  

आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment