जालना, दि.20(जिमाका) : राज्य
शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 17ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात
येत आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा
उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच धोरणात्मक
निर्णयांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने
राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम आणि विभागीय कार्यक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत
पोहोचविणे हा आहे. त्याच अनुषंगाने आज दि. २० सप्टेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील फुलेनगर
येथील भोलेश्वर युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या ठिकाणी ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात आरोग्य, कृषी तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना
व उपक्रमांची नागरिकांना माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाच्या विविध योजना, नागरिकांसाठी
उपलब्ध असलेल्या आरोग्यविषयक सुविधा आणि शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती जिल्हा
परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी दिली.
तसेच महिला व बाल विकास विभागाचे अंमलबजावणी सहाय्यक अधिकारी बी. बी. राठोड यांनी
महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती उपस्थित नागरिकांना
दिली. यावेळी नागरिकांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. संबंधित
अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती
दिली.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ उपलब्ध
झाल्याने या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शासनाच्या योजना आणि उपक्रमांची
माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांच्या अडचणी व शंकांचे निराकरण करण्याच्या
दृष्टीने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी दिसून आले.
कार्यक्रमास भोलेश्वर युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर सुधाकर
खैरे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते. नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
-*-*-*-*-*-*-

No comments:
Post a Comment