विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी
सहभाग नोंदविण्याचे आवाहन
जालना,दि.9(जिमाका): राज्यातील
शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख
करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याच्या उद्देशाने छत्रपती
संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यातून सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय
मागविण्यात आले आहेत. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक,
शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी
या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत
यांनी केले आहे.
महाराष्ट्र
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित
व पारदर्शक करण्याबरोबरच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अपर मुख्य सचिवांच्या
अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीच्या कार्यकक्षेनुसार
राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे
प्रतिनिधी आणि संबंधित हितधारकांशी चर्चा करून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी
सूचना व अभिप्राय संकलित करण्यात येणार आहेत.
या
अनुषंगाने उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व सदस्य 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता
स्मार्ट सिटी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भेट देणार आहेत. त्यापूर्वी जालना
जिल्ह्यातील संबंधित घटकांकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी
कार्यालय, जालना येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष 9 सप्टेंबरपासून
18 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत
कार्यरत राहणार आहे.
विद्यमान
परीक्षा प्रणाली व कार्यपद्धतीचा आढावा, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता व
सुरक्षितता, प्रश्नपत्रिका निर्मितीपासून निकालापर्यंतची प्रक्रिया, डिजिटल
तंत्रज्ञानाचा वापर, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स व
सीसीटीव्ही देखरेख, पेपरफुटी व अन्य गैरप्रकारांना प्रतिबंध, तोतया उमेदवार व
इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत सूचना अपेक्षित
आहेत.
याशिवाय
इतर राज्ये किंवा देशांतील आधुनिक व सुरक्षित परीक्षा प्रणालीतील उत्कृष्ट
पद्धतींचा अभ्यास, परीक्षा केंद्रांसाठी किमान मानके, जिल्हाधिकारी कार्यालय,
पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग व परीक्षा संस्थांमधील प्रभावी समन्वय तसेच
उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था याबाबतही नागरिकांनी आपले
अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
18 सप्टेंबरपर्यंत अभिप्राय
सादर करण्याची मुदत
सूचना
व अभिप्राय निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्याकडे
नोडल अधिकाऱ्यामार्फत सादर करता येतील. प्रत्यक्ष अभिप्राय देण्यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील परीक्षा विभागातील विशेष कक्षात
संपर्क साधता येईल. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी आपले लेखी
अभिप्राय csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in या
ई-मेलवर 18 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाठवावेत. जिल्हाधिकारी
कार्यालयामार्फत प्राप्त सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या
उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. समिती या शिफारशींचा सखोल अभ्यास
करून राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे.
राज्यातील
लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत
छत्रपती संभाजीनगर विभागातील नागरिक, विद्यार्थी, अभ्यासक आणि संबंधित संस्थांनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी,
जालना शशिकांत हदगल यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment