जालना,दि.4(जिमाका) : एकाच वेळी सर्वाधिक
व्यक्तींनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा नवा विक्रम जालना जिल्ह्याने
प्रस्थापित केला. 5 हजार 348 जणांनी
एकाच ठिकाणी, एकाच वेळी शाडूमातीच्या गणेशमूर्ती साकारत यापूर्वीचा
विक्रम मोडीत काढला. या ऐतिहासिक कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का
बुक ऑफ रेकॉर्ड्स
मध्ये नोंद व मान्यता मिळाल्याने जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला
आहे. यापूर्वी 28 ऑगस्ट 2022 रोजी बंगळुरू येथे 3 हजार 308 सहभागींच्या उपस्थितीत
एकाच वेळी गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम नोंदविण्यात आला होता. आज येथील जेईएस
महाविद्यालयात आयोजित उपक्रमात 5 हजार 348 जणांनी सहभाग घेत हा विक्रम तब्बल 2 हजार
040 सहभागींच्या फरकाने मोडला.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या
नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी कार्यालय,
जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग, अद्विक क्लब तसेच
दिव्य मराठी यांच्या समन्वयातून पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला. हजारो विद्यार्थी
आणि नागरिकांनी आज एकाच ठिकाणी एकत्र येऊन शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. या
उपक्रमामागील उद्देश केवळ विश्वविक्रम प्रस्थापित करणे हा नव्हता, तर
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणसंरक्षणाचा संदेश घराघरांत पोहोचविणे हा
होता. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या साहित्याऐवजी नैसर्गिक व पर्यावरणपूरक
शाडूमातीच्या गणेशमूर्तींचा स्वीकार करण्याचे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.
या
प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता,
जलसंवर्धन आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश दिला. हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त
सहभाग हा केवळ विश्वविक्रमाचा आकडा नसून, पर्यावरणपूरक भविष्य घडविण्यासाठी नव्या
पिढीने घेतलेला सामूहिक संकल्प असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
उपक्रमाच्या
यशस्वितेसाठी जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील अधिकारी, विविध शाळांचे
मुख्याध्यापक व शिक्षक, अद्विक क्लब,
दिव्य मराठीची टीम, स्वयंसेवक, समन्वयक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
-*-*-*-*-*-*-

.jpeg)


No comments:
Post a Comment