Thursday, 3 September 2026

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण ‘दिशा’ समिती बैठकीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन


खासदार डॉ. कल्याण काळे घेणार जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

 

जालना,दि.03(जिमाका) : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक बुधवार, दि. 9 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. कल्याण काळे राहणार आहेत.

यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे, योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे तसेच विविध विभागांमध्ये समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

बैठकीत ग्रामविकास, कृषी, पंचायत राज मंत्रालय, आवास व शहरी कार्य मंत्रालय, जलसंधारण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महिला व बाल विकास, आरोग्य, पेयजल व स्वच्छता, शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता, रस्ते व  वाहतुक, सामाजिक न्याय, दिव्यांग, दुरसंचार, मत्सयव्यवसाय, कामगार व रोजगार आदी विविध विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. संबंधित विभागांकडून योजनांची प्रगती, निधीचा वापर, पूर्ण झालेली व प्रलंबित कामे तसेच अंमलबजावणीतील अडचणी याबाबत माहिती घेतली जाणार आहे.

तसेच जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, प्रलंबित प्रश्नांचे निराकरण आणि विकासकामांना गती देण्यासाठी बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधित विभागांचे अधिकारी, समितीचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

 

 

****

No comments:

Post a Comment