271 प्रकरणांत कारवाई; 99
जणांविरुद्ध गुन्हे दाखल
जालना,दि.7(जिमाका): जालना जिल्ह्यात गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक
आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 271 अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून 605.07 लाख रुपये
दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी 209.54 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच 99 व्यक्तींविरुद्ध
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील
सर्व तहसीलदारांना अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत. महसूल, पोलीस आणि परिवहन विभागासह संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने
संयुक्त तपासणी व कारवाई करण्यात येत आहे.
तालुकानिहाय
कारवाईत अंबड तालुका आघाडीवर असून, येथे 68 प्रकरणांमध्ये कारवाई करून 228.61 लाख रुपयांचा दंड आकारण्यात
आला. त्यापैकी 57.32 लाख रुपयांची वसुली झाली असून 23 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात
आले आहेत. जाफ्राबादमध्ये 49 प्रकरणे नोंदवून 129.64 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून 26.53 लाखांची
वसुली करण्यात आली. या तालुक्यात 28 गुन्हे दाखल झाले आहेत.
जालना
तालुक्यात 34 प्रकरणांत 67.29 लाखांचा दंड आकारून
25.32 लाखांची वसुली करण्यात आली असून चार गुन्हे दाखल झाले आहेत. बदनापूरमध्ये 15 प्रकरणांत
26.55 लाखांचा दंड आकारण्यात आला असून 1.15लाखांची वसुली झाली आहे.
येथे 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घनसावंगीमध्ये
17 प्रकरणांत 29.99 लाखांचा दंड आकारून 24.43 लाखांची वसुली झाली असून 14 गुन्हे
दाखल आहेत. परतूरमध्ये 30 प्रकरणांत 25.84 लाखांचा दंड आकारण्यात आला असून 18.49 लाखांची वसुली झाली आहे. येथे चार गुन्हे
दाखल आहेत. मंठा तालुक्यात 34 प्रकरणांत 44.17 लाखांचा दंड आकारून 35.11 लाखांची वसुली करण्यात आली असून तीन गुन्हे दाखल झाले
आहेत. भोकरदनमध्ये 24 प्रकरणांत 52.98 लाखांचा दंड आकारून 21.19 लाखांची वसुली झाली असून 12 गुन्हे दाखल आहेत.
कारवाईदरम्यान
10 वाळू, 4 वाहने तसेच इतर गौण खनिजाशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायदे
व नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे.
गौण
खनिजांचे उत्खनन, वाहतूक किंवा साठवणूक करताना संबंधित व्यक्ती, वाहनमालक, वाहनचालक
तसेच इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम
आणि शासनाच्या प्रचलित आदेशानुसार कारवाई केली जाणार आहे. शासनास देय असलेली रॉयल्टी,
दंड व इतर शुल्कांची वसुली करण्याबरोबरच प्रकरणाच्या स्वरूपानुसार पुढील कायदेशीर कारवाई
केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी
यांनी महसूल, पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात गौण
खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अवैध उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात
आले आहेत.
नागरिकांनी
आपल्या परिसरात गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक अथवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास
आल्यास संबंधित तहसीलदार अथवा महसूल प्रशासनास माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने
केले आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत यापुढेही
प्रभावी कारवाई सुरूच राहणार आहे.
****
No comments:
Post a Comment