Wednesday, 9 September 2026

जालन्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांच्या निवडीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित


 जालना,दि.9(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या धोरणानुसार गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये कला, संस्कृती, पर्यावरण तसेच सामाजिक कार्यांना चालना देण्यासाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड करण्याकरिता जिल्हास्तरीय निवड समिती गठित करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांची नियुक्ती करण्यात आली असून, जे.ई.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अनमोलकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, तसेच कला क्षेत्रातील  गजानन पडुळ आणि संकेत शार्दूल गायन यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश आहे. तर नगर परिषद प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त हे समितीचे सदस्य तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळांच्या अर्जांची जिल्हास्तरीय समिती सचिव आहेत.

100 गुणांच्या निकषावर होणार निवड

तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळांच्या अर्जांची जिल्हास्तरीय समिती छाननी करणार आहे. शासनाने निर्धारित केलेल्या 100 गुणांच्या निकषांनुसार मंडळांचे मूल्यांकन केले जाणार असून, त्यामध्ये कला, संस्कृती, पर्यावरण, सामाजिक कार्य आणि आयोजनातील वैशिष्ट्यांना महत्त्व देण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या मंडळांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उत्कृष्ट ठरलेल्या मंडळाची शिफारस ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’ यांच्याकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

****

No comments:

Post a Comment